कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू; विविध योजनांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय नवी मुंबईतील कोकण भवन येथे सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यासाठी शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू; विविध योजनांसाठी 50 कोटींचा निधी मंजूर
नवी मुंबई, दि. ३ (विमाका): ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सन्मानाने, सुरक्षितपणे आणि सुखकर वातावरणात व्यतीत करता यावा यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय आता कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली.
या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक जीवन अधिक सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे तसेच विमा संरक्षण आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय वृद्धापकाळातील छळवणूक, मालमत्ता व जीवित संरक्षण आणि निवारा यांसारख्या संवेदनशील विषयांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१११/महामंडळे, दिनांक १२ सप्टेंबर २०२४ अन्वये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनाच्या सहाव्या मजल्यावरील कक्ष क्रमांक ६१९ मध्ये हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या कार्यालयामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि लाभ मिळविण्यासाठी आवश्यक सहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठीही हे कार्यालय कार्यरत राहणार आहे.
महामंडळाच्या प्रभावी आणि सुचारू कामकाजासाठी राज्य शासनाने तब्बल ५० कोटी रुपयांचे भागभांडवल मंजूर केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना थेट संपर्क साधता यावा यासाठी ०२२-२७५७५९७९ हा अधिकृत दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध अडचणींच्या निराकरणासाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0