कोल्हापूरच्या ब्रँडिंगसाठी ‘कोल्हापूर महोत्सवा’सारखे उपक्रम राबवा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
कोल्हापूरच्या निसर्ग, पर्यटन, धार्मिक, क्रीडा, उद्योग आणि कृषी वारशाचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी ‘कोल्हापूर महोत्सवा’सारखे उपक्रम राबवावेत, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.
प्रतिनिधी : उमेश जाधव
कोल्हापूर, दि. २९ : कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गसौंदर्य, विपुल निसर्गसंपदा, धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार आणि उद्योगांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. या सर्व वैशिष्ट्यांचे एकात्मिक आणि प्रभावी ब्रँडिंग करून कोल्हापूरला जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे आणण्यासाठी ‘कोल्हापूर महोत्सवा’सारखे उपक्रम राबवावेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, कुलगुरू डॉ. राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा, उद्योग, पर्यटन आणि कृषी उत्पादनांची ओळख
राज्यपाल वर्मा म्हणाले की, कोल्हापूरला मोठी गौरवशाली परंपरा लाभली आहे. येथील कुस्ती आणि कबड्डी यांसारख्या खेळांना मोठी परंपरा आहे. जिल्ह्यातील वने आणि निसर्गसंपदा समृद्ध असून निसर्गसौंदर्यामुळे कोल्हापूरला पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता आहे.
इचलकरंजीचा कापड उद्योग आणि हुपरीचा चांदी उद्योग देश-विदेशात पोहोचला आहे. श्री अंबाबाई आणि श्री जोतिबा यांसारखी प्रसिद्ध तीर्थस्थळे कोल्हापूरची धार्मिक ओळख अधोरेखित करतात. त्याचबरोबर कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल, विविध कृषी उत्पादने आणि हस्तकलेलाही मोठी बाजारपेठ आहे.
या सर्व वैशिष्ट्यांचा एकत्रित वापर करून कोल्हापूरचे ब्रँडिंग करण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. त्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतात. पर्यटन आणि उद्योगवाढीसाठी विमानतळाची कनेक्टिव्हिटी आणखी वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नशामुक्त आणि टीबीमुक्त भारतासाठी व्यापक जनजागृती
सुदृढ समाज आणि निकोप समाजमन घडविण्यासाठी नशामुक्त भारत आणि टीबीमुक्त भारत ही अभियान प्रशासनाने व्यापक स्वरूपात राबवावीत, असे आवाहन राज्यपालांनी केले.
व्यसनमुक्ती ही केवळ कायदे, पोलीस प्रशासन किंवा शासकीय उपाययोजनांपुरती मर्यादित न ठेवता निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिक, कुटुंब आणि समाजाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
नशामुक्त पिढी घडविणे हे मोठे आव्हान असून व्यसनांविरोधात समाजातूनच नकाराची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. समाजातील खेळाडू, कलाकार आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांनी पुढे येऊन जनजागृती व प्रबोधनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहनही राज्यपाल वर्मा यांनी केले.
विविध विकास प्रकल्पांचे सादरीकरण
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यामध्ये महामार्ग विकास, राज्यस्तरीय रस्ते विकास, विमानतळ विस्तार, सांस्कृतिक वारसा व तीर्थक्षेत्र विकास, श्री महालक्ष्मी अंबाबाई विकास आराखडा, श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा, शिक्षण व संशोधन, वैद्यकीय पायाभूत सुविधा, पूर नियंत्रण व प्रदूषणमुक्ती प्रकल्प, प्रस्तावित कोल्हापूर आयटी पार्क, पवणार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण व विस्तार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड व चारपदरी उन्नत मार्गिका आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग आदी प्रकल्पांचा समावेश होता.
शहर सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांवर भर
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शहरातील विविध विकास व सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे सादरीकरण केले.
यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, राजर्षी शाहू खासबाग मैदान, राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा म्युझिकल फाउंटन, ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, श्री अंबाबाई मंदिर पार्किंग व भक्तनिवास, तसेच कोल्हापूर एलिव्हेटर कॉरिडॉर, घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प आणि GIS आधारित मालमत्ता सर्वेक्षण यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता.
शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांचे सादरीकरण
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन यांनी प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये PGI ग्रेडिंग, समृद्ध शाळा आणि पिंक रूम या उपक्रमांचा समावेश होता.
राज्यपाल वर्मा यांनी पिंक रूम उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अशा सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले.
याशिवाय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ट्रान्सजेंडर रेस्क्यू टीमच्या संकल्पनेचेही राज्यपालांनी कौतुक केले.