महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर राज्यात प्रथम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन

महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने १०० टक्के गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

Aug 20, 2026 - 05:01
 0  7
महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर राज्यात प्रथम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन
महास्ट्राईड प्रकल्प, कोल्हापूर जिल्हा विकास आराखडा, कोल्हापूर राज्यात प्रथम

प्रतिनिधी :  उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. १९ : महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विकासाला अधिक गती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प (महास्ट्राईड)’ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हा विकास आराखडा (DSP) अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्याने १०० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या अभूतपूर्व यशाबद्दल १५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करून या कामगिरीचे कौतुक केले.

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने कोल्हापूरचे महत्त्वाचे पाऊल

या यशाबाबत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले की, महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला बळ देणारे हे यश आहे.

कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये समतोल साधत कोल्हापूर जिल्ह्याने विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्वतंत्र पडताळणी संस्थेकडून कठोर मूल्यांकन

जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचे गेल्या महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वतंत्र पडताळणी संस्थेमार्फत (IVA) मूल्यांकन करण्यात आले.

या मूल्यांकनात जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना, आर्थिक तरतुदींचा विनियोग तसेच निर्धारित उद्दिष्टांची पूर्तता यांचा विविध निकषांवर सखोल आढावा घेण्यात आला.

पारदर्शक अंमलबजावणी, वेळेत प्रकल्पपूर्ती, निधीचा प्रभावी वापर आणि खाजगी गुंतवणुकीला चालना या क्षेत्रांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व बाबींच्या आधारे जिल्ह्याला १०० टक्के गुण मिळाले असल्याची माहिती ‘डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक युनिट’चे जिल्हा प्रमुख डॉ. अरुण धोंगडे यांनी दिली.

सांघिक प्रयत्नांना मिळाले यश

कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले हे यश कोणत्याही एका विभागाचे नसून संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या सांघिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगण्यात आले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनासह विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रशासकीय यंत्रणेत नव्या उत्साहाचे वातावरण

शासन निर्णय आणि अधिकृत पत्राद्वारे मिळालेल्या या मान्यतेमुळे जिल्ह्यातील विविध प्रशासकीय यंत्रणांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापुढेही जिल्ह्यात शाश्वत, सर्वसमावेशक आणि गतिमान विकास कायम ठेवण्याचा संकल्प जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी व्यक्त केला.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान

या यशाच्या निमित्ताने जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपायुक्त सीमा आर्दाळकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार, तसेच सागर पाटील, गोपाळ निगवेकर, संदीप फुलारी, किरण मोरे, पांडुरंग लाड यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याने जिल्हा विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात अव्वल स्थान मिळवल्याने आगामी काळातील विकासकामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कृषी, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधत कोल्हापूरच्या विकासाची ही वाटचाल पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.