कोल्हापुरात २२ गटई कामगारांना मोफत गटई स्टॉलचे वितरण; आर्थिक उन्नतीसाठी योजनेचा लाभ घ्या – सचिन साळे
कोल्हापूर समाजकल्याण विभागामार्फत हातकणंगले येथे २२ पात्र गटई कामगारांना मोफत गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांनी स्टॉलचा वापर व्यवसायासाठी करून आर्थिक जीवनमान उंचवावे, असे आवाहन सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले.
कोल्हापूर | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या गटई कामगार कल्याण योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील २२ पात्र लाभार्थ्यांना मोफत गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह, हातकणंगले येथे पार पडला.
यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या हस्ते गटई स्टॉलचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी विशेष समाजकल्याण अधिकारी अक्षय कुरणे, समाजकल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे, वसतिगृह अधीक्षक अशोक करमळकर, कनिष्ठ लिपिक शाहू प्रधान, तालुका समन्वयक सचिन कांबळे, कर्मचारी अमर बोरगे तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सहायक आयुक्त सचिन साळे यांनी लाभार्थ्यांना आवाहन केले की, शासनाकडून मिळालेल्या गटई स्टॉलचा वापर केवळ गटई व्यवसायासाठी करून स्वतःचे आर्थिक जीवनमान उंचवावे. शासनाच्या या योजनेचा उद्देश पारंपरिक व्यवसायाला चालना देणे आणि गटई कामगारांना सुरक्षित व सन्मानपूर्वक व्यवसायाची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती (चर्मकार व तत्सम) प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर लोखंडी पत्र्याचे मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. याशिवाय व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ₹५,००० चे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करण्यात येते.
समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले की, वितरित करण्यात आलेले स्टॉल हे पहिल्या टप्प्यातील आहेत. शासनाकडून पुढील टप्प्यात जसे-जसे स्टॉल उपलब्ध होतील, तसे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने त्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी २२ गटई कामगारांना स्टॉलचे वितरण करण्यात आले असून शासनाच्या या उपक्रमामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कामगारांना सुरक्षित रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.