करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल नको; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे जतन व संवर्धन करताना मंदिराच्या मूळ ढाच्याला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी. नवरात्रोत्सवापूर्वी कामांना गती देतानाच गुणवत्तेवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

Aug 1, 2026 - 04:25
 0  6
करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या मूळ ढाच्यात बदल नको; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी | उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. ३१ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराचे जतन व संवर्धन करताना मंदिराच्या मूळ ढाच्याला कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. मंदिराचे संवर्धन करताना पुरातत्त्व विभागाने केवळ नियमांच्या चौकटीत न राहता लाखो भाविकांच्या श्रद्धा आणि भावनांचाही विचार करावा, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

गेल्या काही दिवसांपासून अंबाबाई मंदिरासंदर्भात विविध माध्यमांमध्ये नकारात्मक वृत्त प्रसिद्ध होत होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची आढावा बैठक आयोजित केली होती.

या बैठकीस आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “मंदिर ही केवळ एक वास्तू नसून त्यामध्ये लाखो भाविकांची श्रद्धा आणि भावना गुंतलेल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे जतन व संवर्धन करताना मूळ रचनेला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.”

नवरात्रोत्सवापूर्वी कामांना गती देण्याच्या सूचना

मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढवून नवरात्रोत्सवापूर्वी अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे. मात्र, कामांना गती देताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी दिल्या.

मंदिर परिसरातील गरुड मंडपाची उभारणीही नियोजित वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंदिराच्या जतन व संवर्धनाची कामे करताना अंबाबाई मंदिरातील पारंपरिक किरणोत्सवाला कोणतीही बाधा येणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

मंदिर आराखड्यातील मिळकतींची माहिती

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंदिर विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या मिळकतींची सविस्तर माहिती बैठकीत दिली.

मंदिर परिसराच्या विकासासाठी भूसंपादनाच्या पहिल्या टप्प्यात ८९ नागरी, १९५ व्यावसायिक आणि ५३ मिश्र स्वरूपाच्या मिळकतींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या मिळकतधारकांशी चर्चा करून त्यांची मते आणि अडचणी जाणून घेत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राठोड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने यांनी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करूनच केले जात असल्याचे बैठकीत सांगितले.

अंबाबाई मंदिराच्या मूळ वास्तुरचनेचे संरक्षण, भाविकांच्या श्रद्धेचा आदर, मंदिरातील धार्मिक परंपरांचे जतन आणि परिसराचा नियोजित विकास या सर्व बाबींमध्ये समतोल राखून पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.