कोल्हापुरात ‘मोगरा फुलला’ कार्यक्रम; संत ज्ञानेश्वरांच्या जीवनप्रवासाचा सुरेल सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भक्ती आणि संगीताचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.
कोल्हापूरमध्ये संत परंपरेचा सुगंध दरवळवणारा एक विशेष सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सोमवार, २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंदराव टेंबे सभागृह, देवळ क्लब, कोल्हापूर येथे होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
“ज्ञानीयांचा राजा मोगरा फुलला” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी प्रसंग उलगडले जाणार आहेत. निरूपणकार गणेश शिंदे आपल्या ओघवत्या शैलीत माऊलींचे जीवनचरित्र सादर करतील, तर सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाला अधिक रंगत येणार आहे. अभंग, भजन, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून भक्ती आणि संगीताचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून संत ज्ञानेश्वरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी कोल्हापूर परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0