कोल्हापुरात १ मेपासून स्वगणना मोहिमेला प्रारंभ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार शाहू छत्रपती यांनी केला सहभाग

भारतीय जनगणनेतील पहिल्या डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात १ मेपासून स्वगणना मोहिमेला सुरुवात झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू छत्रपती यांनी स्वतः माहिती भरून मोहिमेची सुरुवात केली.

May 1, 2026 - 16:39
 0  2
कोल्हापुरात १ मेपासून स्वगणना मोहिमेला प्रारंभ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व खासदार शाहू छत्रपती यांनी केला सहभाग
कोल्हापूर न्यूज, स्वगणना मोहीम, डिजिटल जनगणना,

कोल्हापूर, दि. १ मे (जिमाका) : भारतीय जनगणनेच्या इतिहासातील पहिल्या डिजिटल जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, १ मेपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रारंभ झाला.

मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू छत्रपती यांनी स्वतःची माहिती भरून स्वगणना मोहिमेत सहभाग नोंदवत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.

या ऐतिहासिक प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरता यावी यासाठी ‘स्वगणना’ पोर्टल महाराष्ट्रासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि गृहनिर्माण या विषयावर विशेष भर दिला जाणार आहे.

या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कोल्हापूर जिल्ह्याला देशात अग्रस्थानी आणावे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार शाहू छत्रपती यांनी केले.

नागरिकांनी १ मे ते १५ मे या कालावधीत अधिकृत पोर्टल https://se.census.gov.in⁠� वर जाऊन आपली माहिती भरायची आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित, गोपनीय आणि नि:शुल्क असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेत घराची स्थिती, उपलब्ध भौतिक सुविधा तसेच कुटुंबाची मालमत्ता यासंबंधी संख्यात्मक माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही फसव्या लिंकवर विश्वास ठेवू नये आणि आपला ओटीपी कोणासोबतही शेअर करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

आधुनिक भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला अचूक आणि विश्वासार्ह डेटाबेस तयार करण्यासाठी या स्वगणना मोहिमेची मोठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0