शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने दूरदर्शी नेतृत्व गमावले; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपालांची श्रद्धांजली
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
प्रतिनिधी : नरेश शिंदे
मुंबई, दि. ४ : पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील दूरदर्शी व कार्यतत्पर नेतृत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी आयुष्यभर शिक्षण, सेवा, सामाजिक बांधिलकी आणि विनम्रतेची मूल्ये जपत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, रुग्णालये आणि विविध सामाजिक उपक्रमांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोलाचे योगदान मिळाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एका युगाचा अंत झाल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
समाजकारण आणि राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील कार्याच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात भरीव योगदान देणारे तसेच विविध संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले आहे.
डॉ. पाटील यांनी आपल्या ‘ज्ञानदेव’ या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली आणि संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
सुमारे २०० शैक्षणिक संस्था, विविध प्रकारची आठ विद्यापीठे आणि हजारो विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारलेले त्यांचे कार्य देशाच्या शैक्षणिक विकासातील महत्त्वपूर्ण योगदान ठरले. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर यांसारख्या विविध क्षेत्रांतील महाविद्यालये आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समूहाबरोबरच महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावला.
या संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यसेवेचे जाळेही विस्तारले. राजकारणात त्यांनी दोन वेळा विधानसभा सदस्य म्हणून काम केले. मात्र, शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी अधिक सक्रियपणे कार्य केले. त्यांच्या पुढाकारातून अनेक भव्य शैक्षणिक संकुले तसेच डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प साकार झाले.
“अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन,” हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचे प्रतिबिंब होता. त्यांनी रुजवलेली शिक्षणसेवेची परंपरा, विनम्रतेचा आदर्श आणि समाजहिताची मूल्ये पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे त्यांच्याशी निगडित विविध संस्था आणि समूह शोकमग्न झाले असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
महाराष्ट्राने दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणसंस्था उभारणारे प्रशासक नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणाला नवे क्षितिज देणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी होते, अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेली शैक्षणिक चळवळ लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली. त्यांच्या विद्यापीठांमधून विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशातील हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे. देशभरात सात स्वतंत्र विद्यापीठांची निर्मिती हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा ऐतिहासिक ठेवा असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णालयांमुळे लाखो नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाली. नवी मुंबईतील जागतिक दर्जाच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममुळे क्रीडा क्षेत्रालाही नवी ओळख मिळाली.
शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रांचा समतोल विकास घडवून आणणारे डॉ. डी. वाय. पाटील हे द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक पदाची प्रतिष्ठा वाढवली. सार्वजनिक जीवनात शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीला वाहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर कार्य केले. देशभरात शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली.
शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि चिरस्मरणीय असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले.
त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्ये जपत जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. सार्वजनिक जीवनात त्यांनी साधेपणा, दूरदृष्टी आणि समाजहिताची भूमिका कायम जपली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर-पूर्वेतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
डॉ. डी. वाय. पाटील त्रिपुराचे राज्यपाल असताना त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाल्याचे सांगून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांच्या विनम्र आचरणाचा आणि सौजन्यशील स्वभावाचा गौरव केला.
त्रिपुरा तसेच बिहार येथे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना डॉ. पाटील यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्यपालपदाची प्रतिष्ठा वाढवली. ते दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ होते. उत्तर-पूर्वेतील अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याचे राज्यपालांनी नमूद केले.
महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत त्यांनी उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण संस्था उभारल्या. गेल्या तीन दशकांत या संस्थांमधून लाखो विद्यार्थी घडले असून, ते आज विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
समाजकारण, राजकारण आणि शिक्षण क्षेत्रातील डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील, असे सांगून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाने एक दूरदर्शी शिक्षणमहर्षी, समाजाभिमुख विचारवंत, अनुभवी सार्वजनिक नेतृत्व आणि लाखो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक गमावला आहे. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांनी जपलेली शिक्षण, सेवा, विनम्रता व समाजहिताची मूल्ये पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, अशा भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0