पर्यटननगरी लोणावळ्यातील पार्किंगची समस्या सुटणार; रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार
लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत. रेल्वे प्रशासनाने उपलब्ध जागेची पाहणी करून वाहनतळ विकसित करण्याची ग्वाही खासदार श्रीरंग बारणे यांच्या बैठकीत दिली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
मावळ : पर्यटननगरी लोणावळ्यातील पार्किंग समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रशासन उपलब्ध जागेची पाहणी करून वाहनतळ विकसित करणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेची चालू, प्रलंबित आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार बारणे यांनी रेल्वेचे महाप्रबंधक हिरेशजी मीना यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी आमदार सुनील शेळके, अपर मंडल रेल प्रबंधक निरज यादव, मंडल वाणिज्य प्रबंधक मानस पुरे, लोणावळा नगरपरिषद पदाधिकारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
लोणावळ्यात पार्किंगला दिलासा
खासदार बारणे म्हणाले की, पर्यटनस्थळ असल्याने लोणावळ्यात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात. रेल्वे प्रवाशांना वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. रेल्वे स्टेशनलगत उपलब्ध जागेचा वापर करून वाहनतळ विकसित करावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
रेल्वे म्युझियम आणि ओव्हरब्रिजची मागणी
लोणावळ्यात रेल्वेच्या ताब्यातील २५ एकर जागेत रेल्वे म्युझियम उभारावे, ओव्हरब्रिजच्या कामाला गती द्यावी, तसेच कुमार रिसॉर्टपासून बाजारपेठेकडे जाणाऱ्या पुलाचे रुंदीकरण करावे, अशी मागणीही बारणे यांनी केली.
भुशी धरण परिसरातील स्थानिकांना दिलासा
भुशी धरण परिसरात हंगामी व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर रेल्वेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती. या ठिकाणी मागील ४० वर्षांपासून स्थानिक नागरिक चहा, वडापाव, भजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.
स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी समन्वयातून चांगला प्रस्ताव आणून भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले.
पुणे-लोणावळा चौथ्या ट्रॅकला गती द्या
पनवेल, नेरळ आणि कर्जत रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास करावा. पुणे ते लोणावळा चौथ्या ट्रॅकच्या कामाला गती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच मुंबई-पुणे-बंगळुरू आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा आराखडा तयार करून कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली.
एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करा
कोरोना काळात बंद करण्यात आलेले एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. कर्जत स्थानकावर कोयना एक्सप्रेस, हैदराबाद, चेन्नई, सिद्धेश्वर, कोल्हापूर-अहमदाबाद, बंगळुरू-जोधपूर आदी गाड्यांना थांबा द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
रेल्वे गेट २४ तास खुले ठेवा
मावळातील डोंगरगाव येथील गेट क्रमांक ३४ हे फक्त १२ तास खुले असते. ते २४ तास सुरू ठेवावे. नाणे येथील गेट क्रमांक ४३ सुरू ठेवावे, कामशेत येथे ओव्हरब्रिज उभारावा आणि सोमाटणे येथील गेट क्रमांक ७५ येथे अंडरपास तयार करावा, अशा मागण्याही बैठकीत मांडण्यात आल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0