महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही; 36,211 कंपन्यांच्या नोंदणी रद्दबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर गेलेला नसल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील 36,211 कंपन्यांची नोंदणी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली असून परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

Aug 14, 2026 - 03:52
 0  9
महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही; 36,211 कंपन्यांच्या नोंदणी रद्दबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
उदय सामंत, महाराष्ट्र उद्योग, 36,211 कंपन्या, कंपनी नोंदणी रद्द, उद्योग महाराष्ट्र,

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

गडचिरोली, दि. 13 ऑगस्ट 2026 : महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याच्या तसेच राज्यातील 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याच्या आरोपांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर गेलेला नसून, विविध कारणांमुळे काही कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभेत देण्यात आलेल्या उत्तराच्या आधारे राज्यातील 36 हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ही आकडेवारी उद्योग राज्याबाहेर गेल्याचे दर्शवत नसून, विविध कारणांमुळे कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याची असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

36,211 कंपन्यांच्या आकडेवारीबाबत स्पष्टीकरण

केंद्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक आर्थिक दस्तऐवज वेळेत सादर न करणाऱ्या किंवा दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया केली जाते. ही नियमित स्वरूपाची प्रक्रिया असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील 36,211 कंपन्यांची नोंदणी अशाच प्रकारे रद्द करण्यात आली आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश आहे. यात वित्तीय सेवा क्षेत्रातील 14,613, मनुष्यबळ सेवा क्षेत्रातील 6,582, ट्रेडिंग क्षेत्रातील 4,196 आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील 2,356 कंपन्यांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सर्व कंपन्या महाराष्ट्रातून उद्योग स्थलांतरित झाल्याचे चित्र निर्माण करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इतर राज्यांतही मोठ्या संख्येने नोंदणी रद्द

कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसल्याचे सामंत यांनी सांगितले. याच कालावधीत दिल्लीमध्ये सुमारे 34,800, उत्तर प्रदेशात 23,100 आणि गुजरातमध्ये 11,200 कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

देशभरात एकूण 2 लाख 4 हजारांहून अधिक कंपन्यांबाबत अशा प्रकारची प्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग विभागामार्फत सामंजस्य करार (MoU) झालेली एकही कंपनी बंद पडलेली नाही. विविध सेवा, वाहतूक, व्यापार किंवा अन्य क्षेत्रांतील कंपन्यांची आकडेवारी औद्योगिक कंपन्यांशी जोडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम

राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीबाबत माहिती देताना उदय सामंत यांनी सांगितले की, गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

दावोस येथे करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 75 ते 80 टक्के करारांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असून, हे प्रमाण देशातील सर्वोच्च असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या GCC परिषदेतून राज्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून सुमारे पाच लाख तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

चाकणमधून 40 उद्योग गेल्याचा दावा चुकीचा

चाकण औद्योगिक क्षेत्रातून 40 उद्योग बाहेर गेल्याच्या दाव्याबाबतही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या 16 तारखेला उद्योगांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीतील स्टील हब आणि कौशल्य विकासाला चालना

गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत बोलताना उदय सामंत यांनी जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या स्टील हबमुळे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर स्थानिक युवकांना उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. स्थानिक नागरिक आणि संबंधित घटकांना विश्वासात घेऊन औद्योगिक विकासाची कामे करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

औद्योगिक विकासाचा लाभ स्थानिकांना मिळावा, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आणि विकासाची प्रक्रिया सर्वसमावेशक असावी, या दृष्टिकोनातून शासन काम करत असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी नमूद केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.