दोष सिद्ध होण्यापूर्वी व्यापाऱ्यांची बदनामी थांबवा; महाराष्ट्र चेंबरचे ‘एफडीए’ला निवेदन
प्राथमिक तपासणी किंवा धाडीनंतर व्यापाऱ्यांची नावे व छायाचित्रे प्रसिद्ध करू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने एफडीएकडे केली आहे. अंतिम अहवालानंतरच कायदेशीर कारवाई स्पष्ट करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
नाशिक ब्यूरो:
नाशिक (प्रतिनिधी) : अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या किंवा अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कायदेशीर कारवाई करावी, मात्र केवळ प्राथमिक तपासणी, नमुने घेणे किंवा धाड पडल्याच्या आधारावर व्यापाऱ्याचे नाव व छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांना दोषी ठरवू नये, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या (MACCIA) पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात चेंबरच्या शिष्टमंडळाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक संचालक मंगेश माने यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी MACCIAच्या शाखा को-चेअरमन दिपाली चांडक, जिल्हा समन्वयक भावेश मानेक, एफएमसीजी समितीचे चेअरमन तथा नाशिक धान्य घाऊक किराणा संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, कार्यकारिणी सदस्य राजेश मालपुरे, मिथीला कापडणीस, आशुतोष गायकवाड, संदीप सोमवंशी, महावीर खटोड आणि राजेश वाघचौरे उपस्थित होते.
प्राथमिक तपासणी आणि गुन्हा सिद्ध होणे वेगळे
चेंबरने निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईचे व्यापारी आणि नागरिक म्हणून स्वागत आहे. मात्र, एखाद्या दुकानावर धाड पडणे, नमुने घेणे किंवा प्राथमिक तपासणी होणे आणि प्रत्यक्ष कायदेशीर गुन्हा सिद्ध होणे या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत.
तपासणीदरम्यान घेतलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल आणि त्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची असते. त्यामुळे अंतिम निष्कर्ष येण्यापूर्वी संबंधित व्यापाऱ्याला दोषी ठरविणारी भाषा वापरल्यास त्याच्या सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठा फटका बसू शकतो, असे चेंबरने नमूद केले.
नाव व छायाचित्र प्रसिद्ध न करण्याची मागणी
प्राथमिक तपासणीच्या आधारे प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियावर व्यापाऱ्यांची नावे, दुकानांची माहिती अथवा छायाचित्रे प्रसिद्ध केल्याने ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्याचा संबंधित व्यापाऱ्याच्या व्यवसायावर तसेच मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे चेंबरने म्हटले आहे.
त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन दोष सिद्ध होईपर्यंत संबंधित दुकानदार किंवा व्यावसायिकाची ओळख उघड करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कारवाई तथ्याधारित आणि संतुलित असावी
तपासणीदरम्यान नमुने घेणे किंवा कागदपत्रांची तपासणी करणे ही कायदेशीर प्रक्रियेची सुरुवातीची पायरी आहे. त्यामुळे वृत्त प्रसिद्ध करताना संबंधित नमुने केवळ तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील अहवालानंतर कायदेशीर कारवाईबाबत निर्णय होणार आहे, हे स्पष्टपणे नमूद करावे, अशी मागणी चेंबरने केली.
तसेच पुढील तपासणीत संबंधित व्यापारी निर्दोष आढळल्यास त्याबाबतही त्याच गांभीर्याने आणि व्यापक स्वरूपात माहिती प्रसिद्ध करून व्यापाऱ्याची झालेली प्रतिमाहानी भरून काढण्यास मदत करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
व्यापाऱ्यांची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन
व्यावसायिक प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो; मात्र अपूर्ण माहिती किंवा चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे ती अल्पावधीत बाधित होऊ शकते. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहेच, त्याचबरोबर प्रामाणिक व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचे नातेही कायम राहणे आवश्यक असल्याचे चेंबरने स्पष्ट केले.
त्यामुळे FDA प्रशासन, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर बातम्या प्रसारित करणाऱ्या व्यक्तींनी या विषयाकडे संवेदनशीलतेने आणि तथ्यांच्या आधारे पाहावे, असे आवाहन महाराष्ट्र चेंबरच्या वतीने करण्यात आले आहे.
FDAकडून सकारात्मक प्रतिसाद
सहायक संचालक मंगेश माने यांनी चेंबरच्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रशासनाकडून निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने कारवाई करण्यात येईल, तसेच या विषयात आवश्यक ती काळजी घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याशिवाय व्यापाऱ्यांमध्ये अन्न सुरक्षा, कायदेशीर प्रक्रिया आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी लवकरच व्यापाऱ्यांसोबत अवेअरनेस सेमिनार आयोजित करण्यात येणार असल्याचे मंगेश माने यांनी सांगितले.