राज्यभर प्रतिबंधित गुटखा-पानमसालाविरोधात मोठी कारवाई; १९५ धाडी, १.९९ कोटींचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासन विभागाने १ ते ५ जून २०२६ दरम्यान राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तत्सम अन्नपदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबवून १९५ धाडी टाकल्या. या कारवाईत १.९९ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून १९२ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई | प्रतिनिधी
राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम अन्नपदार्थांच्या अवैध उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून १ ते ५ जून २०२६ या कालावधीत राज्यभर १९५ धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून १९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि कलम ५९ अंतर्गत गुन्हे दाखल करून व्यापक कारवाई करण्यात येत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
धुळे, नांदेड आणि धाराशिवमध्ये मोठी जप्ती
३ जून रोजी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे टाकलेल्या धाडीत २३ लाख ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.
४ जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाका येथे करण्यात आलेल्या कारवाईत ६० लाख ५० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा आणि वाहने जप्त करण्यात आली. त्याच दिवशी नांदेड येथे १७ लाख ५२ हजार ४५० रुपये किमतीचा साठा आणि वाहन जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात झालेल्या धाडीत ६ लाख १९ हजार ९८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ जून रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे संशयाच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई आणि पुणे विभागातही मोठी कारवाई
बृहन्मुंबई क्षेत्रात ३० धाडी टाकून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ३० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
तर पुणे विभागात ७९ धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त (अन्न) महेश ना. चौधरी यांनी दिली.
अवैध व्यापाराविरोधात मोहीम सुरूच
राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1