भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या मुंबई दौऱ्यात आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यात उद्योग, पर्यटन, स्मार्ट सिटी, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर दिला. यावेळी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या.

May 8, 2026 - 02:31
 0  11
भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध

मुंबई, दि. ७ : भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज असून सांस्कृतिक, आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यानिमित्त आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी व्हिएतनामच्या उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनी भारत-व्हिएतनाम भागीदारी अधिक बळकट करून ‘Enhanced Comprehensive Strategic Partnership’ नव्या उंचीवर नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे अभिनंदन केले.

बौद्ध पर्यटन आणि थेट हवाई सेवेवर भर

महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्माच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. तसेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांना भेट देण्यासाठी व्हिएतनामच्या पर्यटक आणि गुंतवणूकदारांचे स्वागत केले.

छत्रपती संभाजीनगर आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यात थेट हवाई सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडत स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आकर्षणाचे केंद्र

मुंबई आणि हो ची मिन्ह शहरांमध्ये अनेक बाबतीत साम्य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शहरांदरम्यान नुकत्याच झालेल्या कराराचे स्वागत केले. व्हिएतनामची विनग्रूप कंपनी महाराष्ट्रात ६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार असून हा दक्षिण-पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा गुंतवणूक करार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली या शहरांमधील औद्योगिक संधींबाबत माहिती देत त्यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना उद्योग, ऊर्जा, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीचे आवाहन केले.

मुंबई आणि पुणे येथील औषधनिर्माण उद्योग जागतिक दर्जाचे असून व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा विश्वासार्ह पुरवठा करण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत-व्हिएतनाम आर्थिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन

यावेळी बोलताना व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी उद्योग, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि व्यापार क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली.

मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्र असून येथे आयोजित इंडिया-व्हिएतनाम बिझनेस फोरम दोन्ही देशांतील संबंधांना नवी दिशा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.

इलेक्ट्रिक वाहने, ऊर्जा, तंत्रज्ञान सेवा, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात भारत-व्हिएतनाम सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत त्यांनी भारतीय उद्योगांना व्हिएतनाममध्ये अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी व्यापार सुलभीकरण, लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी, कौशल्य विकास आणि गुंतवणूक प्रक्रियेत सुलभता आणण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या उपस्थितीत भारत आणि व्हिएतनाममधील विविध उद्योग क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे मुंबईहून प्रयाण

दरम्यान, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री ८.३० वाजता विमानाने प्रयाण केले.

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच व्हिएतनामचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0