नाशिकमध्ये ‘महाराष्ट्र क्रीडा विकास प्रतिष्ठान’ची स्थापना; खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी नवे व्यासपीठ

नाशिक येथे “महाराष्ट्र क्रीडा विकास प्रतिष्ठान” स्थापनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना प्रशिक्षण, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन आणि आर्थिक स्थैर्य देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

May 11, 2026 - 21:37
 0  3
नाशिकमध्ये ‘महाराष्ट्र क्रीडा विकास प्रतिष्ठान’ची स्थापना; खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी नवे व्यासपीठ
महाराष्ट्र क्रीडा विकास प्रतिष्ठान, नाशिक क्रीडा बातमी

नाशिक ब्युरो 

नाशिक : राज्यातील खेळाडूंचा सर्वांगीण विकास आणि क्रीडा क्षेत्रातील विविध आव्हानांवर प्रभावीपणे मात करण्याच्या उद्देशाने “महाराष्ट्र क्रीडा विकास प्रतिष्ठान” या नव्या संस्थेच्या स्थापनेबाबत नाशिक येथे महत्त्वपूर्ण विचारमंथन बैठक पार पडली. सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या पुढाकाराने हॉटेल रामा हेरिटेज येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशिक्षक, समुपदेशक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा केली. “खेळ हेच साधना, यश हीच ओळख” हे ब्रीदवाक्य समोर ठेवून राज्यातील खेळाडूंना विज्ञानाधारित प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती रवींद्र नाईक यांनी दिली.

विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रतिभावान खेळाडूंना शोधून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी “टॅलेंट आयडेंटिफिकेशन” अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच आधुनिक प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, दुखापतीनंतर पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) आणि मानसिक समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

बैठकीत संस्थेच्या २२ सूत्री कार्यक्रमावर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये “स्किल इंडिया मिशन” आणि “एनएसडीसी”च्या माध्यमातून खेळाडूंना कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे, करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, पारंपरिक भारतीय खेळांचे संवर्धन करणे आणि पॉडकास्ट, यूट्यूब चॅनेल व कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून देणे यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

शासनाच्या क्रीडा योजनांमध्ये सुधारणा सुचवणे, खेळाडूंच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवणे आणि खेळाडू अधिवेशन आयोजित करणे यावरही बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला क्रीडा समुपदेशक जयश्री खिलारी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, शैलजा जैन, आनंद खरे, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका अथरे, विविध क्रीडा प्रशिक्षक, अधिकारी, क्रीडा पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सीएसआर निधी आणि विविध संस्थांशी सामंजस्य करार करून खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “ट्रेन द ट्रेनर” उपक्रमाच्या माध्यमातून क्रीडा मार्गदर्शकांचे प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात एक सकारात्मक आणि दूरदृष्टीचा उपक्रम सुरू झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.