महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्रात ६.५ लाख कोटींची गुंतवणूक; २५,४०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी एनटीपीसी, अदानी पॉवर, रिलायन्स आणि बजाज समूहासोबत सामंजस्य करार करण्यात आले असून राज्यात ६.५ लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांतून २५,४०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि १.२३ लाख रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

May 19, 2026 - 18:59
 0  2
महाराष्ट्रात अणुऊर्जा क्षेत्रात ६.५ लाख कोटींची गुंतवणूक; २५,४०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा मार्ग मोकळा
महाराष्ट्र अणुऊर्जा, देवेंद्र फडणवीस, अणुऊर्जा गुंतवणूक,

मुंबई | दि. १९ मे २०२६

भारताला “संपन्न ऊर्जा राष्ट्र” बनवण्याच्या दिशेने महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावणार असून राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात तब्बल ६ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या माध्यमातून २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती आणि १ लाख २३ हजार ५०० रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत राज्य शासनाने अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रातील चार मोठ्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MoU) केले. यामध्ये एनटीपीसी लिमिटेड, अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज समूह) यांचा समावेश आहे.

यावेळी पारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच संबंधित कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला शून्य कार्बन उत्सर्जन करणारे संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीसाठी स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करत आहे. अणुऊर्जा ही स्वच्छ आणि दीर्घकालीन ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “राज्यात होणारी ही गुंतवणूक केवळ ऊर्जा निर्मितीसाठीच नव्हे तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठीदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासन संबंधित कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल.”

कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार?

अदानी पॉवर लिमिटेड

अदानी पॉवर कंपनी राज्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पातून ६ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार असून सुमारे १२ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती अपेक्षित आहे. या माध्यमातून एक लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले.

एनटीपीसी लिमिटेड

एनटीपीसी लिमिटेड १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून ७२०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे ५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

ललितपुर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (बजाज समूह)

बजाज समूहाच्या ललितपुर पॉवर जनरेशन कंपनीकडून २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून ५ हजार मेगावॅट ऊर्जा निर्मिती आणि ३ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणीसाठी गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत जागांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. तसेच राज्य शासनाचा संबंधित विभाग कंपन्यांना आवश्यक सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0