रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे सक्तीचे; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

May 22, 2026 - 22:54
 0  2
रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे सक्तीचे; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
रिक्षा चालक मराठी भाषा, टॅक्सी चालक मराठी प्रशिक्षण, प्रताप सरनाईक,

मुंबई, दि. २२ : राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान असावे आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात आयोजित रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भातील बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, सहआयुक्त रवी गायकवाड, संदेश चव्हाण, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. ना.कों. भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्यात मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या सहकार्याने मराठी भाषा प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

रिक्षा संघटना तसेच शिवसेना शाखांमध्ये उपलब्ध जागांवरही प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार असून चालकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून प्रशिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी राज्यभरातील सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार आहेत. चालकांच्या सोयीने दर महिन्याला चार शनिवार आणि रविवार किमान चार तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र

मराठी भाषा प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षेद्वारे व्यवहारिक मराठी भाषेची क्षमता तपासली जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद

मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा विभागामार्फत दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाची तयारी करण्यात येत आहे. उर्वरित खर्च परिवहन विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

प्रशिक्षणासाठी विशेष तयारी

प्रशिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत :

सचित्र आणि सोप्या भाषेतील अभ्यासक्रम पुस्तिका

प्रत्येक प्रशिक्षण केंद्रांतर्गत उपकेंद्रांची स्थापना

रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबेर आणि रॅपिडो वाहनांवर मराठी जनजागृती स्टिकर्स

मराठी भाषा प्रचारासाठी विशेष बॅनर्स

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालकांना विनामूल्य उपलब्ध असलेले प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करण्याचे आवाहन केले आहे. तसेच १५ ऑगस्टनंतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0