मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मासूम’ प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यभर विस्तार करण्यात आला आहे.
मुंबई/प्रतिनिधी – बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याला बळकटी देण्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे.
महिला व बाल विकास विभाग आणि Aditya Birla Education Trust यांच्या ‘ईमपॉवर’ उपक्रमाच्या सहकार्याने हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत २० संस्थांमधील १,८६१ मुलांना या प्रकल्पाचा लाभ मिळाला असून ५,००० हून अधिक समुपदेशन सत्रे घेण्यात आली आहेत.
या प्रकल्पाद्वारे त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुलांना ट्रॉमा-आधारित समुपदेशन दिले जाते. मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे मुलांची तपासणी करून प्रशिक्षित तज्ज्ञांकडून समुपदेशन व थेरपी दिली जाते. आवश्यकतेनुसार दीर्घकालीन उपचारांचीही व्यवस्था केली जाते.
प्रारंभी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला हा प्रकल्प आता राज्यातील १२१ बालसंगोपन संस्थांपर्यंत विस्तारण्यात आला आहे. या संस्थांमध्ये अनाथ, मानव तस्करीतून मुक्त झालेली मुले तसेच कायद्याच्या संघर्षात असलेली मुले राहतात.
‘मासूम’ प्रकल्पांतर्गत पारंपरिक समुपदेशनासोबत आर्ट-आधारित थेरपीचाही वापर केला जातो. यामुळे मुलांना आपल्या भावना सहज व्यक्त करता येतात आणि त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल दिसून येतो. पुढील टप्प्यात ऑक्युपेशनल थेरपी सुविधाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे क्षमता विकास. बालकल्याण समिती सदस्य, जिल्हा बाल संरक्षण युनिट अधिकारी आणि संस्थांतील कर्मचारी यांना मानसिक आरोग्य व संवाद कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मुलांसाठी अधिक सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण तयार होत आहे.
नवीन करारानुसार अधीक्षक, बालकल्याण समिती आणि किशोर न्याय मंडळ यांच्या समन्वयातून प्रत्येक मुलाला त्याच्या गरजेनुसार सेवा मिळेल याची खात्री केली जाणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीबाबत मासिक आणि तिमाही अहवाल सादर केले जाणार आहेत.
‘मासूम’ प्रकल्प हा सार्वजनिक-खासगी भागीदारीचा एक प्रभावी नमुना ठरत असून, मुलांमध्ये आत्मविश्वास, भावनिक सक्षमता आणि उज्ज्वल भविष्याची दृष्टी निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0