कामातील गुणवत्ता अबाधित ठेवत नालेसफाईचा वेग वाढवा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबईतील नालेसफाई आणि रस्ते विकास कामांची महापौर रितू तावडे यांनी पश्चिम उपनगरात प्रत्यक्ष पाहणी केली. कामांचा वेग वाढवतानाच गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच झाडांचे संवर्धन, पूर नियंत्रण व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबतही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

May 14, 2026 - 23:19
May 14, 2026 - 23:20
 0  4
कामातील गुणवत्ता अबाधित ठेवत नालेसफाईचा वेग वाढवा; महापौर रितू तावडे यांचे प्रशासनाला निर्देश
रितू तावडे, नालेसफाई, मुंबई महापालिका, बीएमसी, रस्ते विकास कामे,

मुंबई प्रतिनिधी 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू असलेल्या नालेसफाई आणि रस्ते विकास कामांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी पश्चिम उपनगरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामांचा वेग वाढवून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देताना गुणवत्तेत कोणतीही तफावत होऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

मुंबईतील नद्या आणि लहान-मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, ज्या ठिकाणी अजूनही गाळ आणि कचरा साचलेला आहे, त्या ठिकाणी गाळ उपशाचा वेग वाढवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्यात मालाड (पश्चिम) येथील ऑर्लेम चर्च मार्ग, मार्वे रस्ता, डी-मार्टजवळील रामचंद्र नाला, गोरेगाव (पश्चिम) येथील ओशिवरा नदी, जुहू येथील इर्ला नाला आणि संत कबीर मार्ग, खार परिसरातील एसएनडीटी नाला तसेच वांद्रे (पूर्व) येथील वाकोला नदी आणि हरणे गुरुजी मार्ग या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

यावेळी ‘पी पूर्व’ व ‘पी पश्चिम’ विभाग समितीचे अध्यक्ष हैदर अली असलम शेख, ‘के पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड, नगरसेवक दीपक कोतेकर, चिंतामणी निवाटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापौरांनी मालवणी नाला आणि एसएनडीटी नाल्याच्या स्वच्छतेच्या कामांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले. तसेच या दोन्ही ठिकाणी पुन्हा आकस्मिक पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जुहू येथील इर्ला नाल्याच्या पाहणीदरम्यान महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नाल्यालगतची संरक्षक भिंत ढासळल्याचे निदर्शनास आल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित दुरुस्तीचे आदेश देण्यात आले. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन कामकाजाची माहितीही त्यांनी घेतली.

खार परिसरातील गझधरबांध उदंचन केंद्रात महापौरांनी संगणकीय नियंत्रण प्रणाली, ट्रॅश बूमद्वारे कचरा वर्गीकरण आणि पूर नियंत्रण द्वाराची कार्यपद्धती याची माहिती अभियंत्यांकडून घेतली.

रस्ते विकास कामांच्या पाहणीवेळी सिमेंट काँक्रिट रस्ते तयार करताना झाडांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. झाडांची मुळे उघडी पडू नयेत म्हणून बुंध्याभोवती माती टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणार नाही यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्या आणि झाकणांचीही पाहणी करण्यात आली.

या दौऱ्यात महापौरांनी मालाड पश्चिम येथील महाराणा प्रताप क्रीडांगण येथे भेट देत तेथील क्रीडा सुविधांचे कौतुक केले. माजी नगरसेविका जया तिवाना यांनी क्रीडांगण विकासाबाबत माहिती दिली. मुंबईतील मोकळ्या भूखंडांवर अशा प्रकारची क्रीडांगणे उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे महापौरांनी सांगितले. तसेच या परिसरात शहरी शेतीची संकल्पना राबविण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0