“मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त” – महापौर रितू तावडे यांचा वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना दिलासा
वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट करत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी कोळी समाजाला निर्धास्तपणे व्यवसाय करण्याचे आवाहन केले.
मुंबई | प्रतिनिधी (दि. ७ मे २०२६)
वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नसल्याचे स्पष्ट करत मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कोळी भगिनींना आणि मासळी व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे. “मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त,” अशा शब्दांत त्यांनी कोळी समाजाला आश्वस्त केले.
वाकोला मासळी बाजारात मासे कापण्यास मनाई केल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी आज सकाळी वाकोला मासळी बाजाराला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक कोळी भगिनी आणि व्यावसायिकांशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी केली.
महापौर तावडे यांनी स्पष्ट केले की, महानगरपालिकेकडून मासे कापण्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. मुंबईतील सर्व मासळी बाजारांमध्ये कोळी समाजाने निर्धास्तपणे आपला व्यवसाय सुरू ठेवावा. मुंबईचे मूळ नागरिक म्हणून कोळी समाजाची स्वतंत्र ओळख असून त्यांच्या पाठीशी संपूर्ण महानगरपालिका खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, मासळी व्यवसायावर निर्बंध असल्याच्या बातम्या या अपप्रचाराचा भाग असल्याचे सांगत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी बाजारातील कोळी भगिनींनी देखील आपल्याला कोणीही रोखले नसल्याचे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात नसल्याचे महापौरांना सांगितले. भविष्यात जर कोणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर थेट संपर्क साधावा, सर्व अडचणींचे निराकरण स्वतः करेन, असे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी दिले.
महापौरांच्या या भूमिकेमुळे कोळी समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून वाकोला परिसरात पसरलेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1