MBBS प्रवेशाच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; 12 वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला मुंबईत अटक
एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि गेल्या 12 वर्षांपासून महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या सराईत आरोपीला सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात विविध राज्यांतील 18 ते 20 फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले असून तो जळगाव न्यायालयाने फरार घोषित केला होता.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. 21 : एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणि मागील 12 वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमधील अनेक पोलीस ठाण्यांना हवा असलेल्या सराईत आरोपीला सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीविरोधात विविध राज्यांतील 18 ते 20 फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अबीद युसूफ अन्सारी (वय 51), रा. नागपाडा, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सर जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 530/2024 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 406, 419, 420, 465, 467, 468, 471 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू रत्न गुडेकर यांच्या मुलाला ठाण्यातील राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपीने तब्बल 42 लाख रुपये घेतले होते. मात्र प्रवेश न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली.
तपासादरम्यान आरोपी गुजरात, राजस्थान, लोणावळा आणि महाबळेश्वर परिसरात लपून राहत असल्याची माहिती मिळाली. मात्र तो सतत ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर आरोपी उत्तराखंड पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील एका इमारतीत लपल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर आणि त्यांच्या पथकाने तब्बल सहा तास विविध वेशांतर करून पाळत ठेवली आणि आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा सदर गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
तपासात आरोपीविरोधात नागपाडा, आग्रीपाडा आणि जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे जळगाव न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार मुंबई शहरातील तीन, महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील चार, दिल्लीतील तीन, मध्य प्रदेशातील दोन आणि उत्तराखंडमधील एका प्रकरणात आरोपीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अशाच प्रकारच्या आणखी अनेक फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-1, सहायक पोलीस आयुक्त डोंगरी विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नेरकर, पोलीस हवालदार तडवी, घाडगे, पोलीस शिपाई शेवरे, चौधरी, पठाण तसेच तांत्रिक सहाय्यक पोलीस हवालदार सचिन पाटील यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0