म्हाडाच्या १७ व्या लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी; नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा
म्हाडाच्या १७ व्या लोकशाही दिनात नागरिकांच्या दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. ११ मे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या वतीने वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या लोकशाही दिनात नागरिकांच्या दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. या लोकशाही दिनाचे अध्यक्षस्थान म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी भूषविले.
लोकशाही दिनात आलेल्या दोन्ही प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सदनिकेचा ताबा देण्याचे निर्देश
अर्जदार रावसाहेब कांबळे यांनी छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या २०१२ मधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत सदनिकेसाठी अर्ज करून संपूर्ण रक्कम भरली होती. मात्र, त्यांनी रक्कम उशिरा भरल्याने सदनिकेचा ताबा प्रथम क्रमांकाच्या यशस्वी अर्जदाराला देण्यात आला होता.
यावर सुनावणी करताना संजीव जयस्वाल यांनी अर्जदाराने रक्कम जमा केलेली असल्याने कोणतीही अतिरिक्त रक्कम न घेता संबंधित गृहनिर्माण प्रकल्पातील उपलब्ध सदनिकेची दुरुस्ती, रंगरंगोटी करून ती राहण्यायोग्य अवस्थेत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश दिले. पुढील महिन्यातील लोकशाही दिनापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
चारकोप येथील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्याचे आदेश
दुसऱ्या प्रकरणात प्रतिभा घाडगे यांनी चारकोप येथील आश्रय सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये त्यांच्या सदनिकेतील शौचालयाचा पाणीपुरवठा सोसायटीकडून बंद करण्यात आल्याची तक्रार केली होती.
या प्रकरणावर सुनावणी करताना संजीव जयस्वाल यांनी संबंधित सहकार उपनिबंधकांनी सोसायटीचे पदाधिकारी आणि अर्जदार यांना समोरासमोर बोलावून समेट घडवून आणावा तसेच सदनिकेतील शौचालयाचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, असे निर्देश दिले.
आजच्या लोकशाही दिनात मुंबई मंडळाशी संबंधित एक आणि छत्रपती संभाजीनगर मंडळाशी संबंधित एका अर्जावर सुनावणी घेण्यात आली.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0