म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीला प्रचंड प्रतिसाद; ७५ हजारांहून अधिक अर्ज दाखल
म्हाडा मुंबई मंडळाच्या २,६४० सदनिकांच्या संगणकीय सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले आहेत. विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या २,६४० सदनिकांच्या संगणकीय सोडतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीसाठी एकूण ७५ हजार ३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिका सरासरी २८.५४ अर्ज दाखल झाले आहेत.
म्हाडाच्या या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाढती घरांची मागणी आणि परवडणाऱ्या दरातील सदनिकांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले आहेत.
सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू असल्याने संगणकीय सोडतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे.
मुंबई मंडळाने कन्नमवार नगर (विक्रोळी), पत्राचाळ सिद्धार्थ नगर (गोरेगाव), जुने मागाठाणे व गोराई (बोरीवली), सुभाष नगर (चेंबूर), गांधीनगर (वांद्रे), पंतनगर (घाटकोपर), गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर (दादर), पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल (वडाळा) या प्रकल्पांमधील २,६४० सदनिकांची विक्री जाहीर केली होती.
यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी १० जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्जदारांना १२ जूनपर्यंत ऑनलाइन दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर छाननी करून १६ जून रोजी अंतिम पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात येईल.
दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी विक्रोळी येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १,२२१ सदनिकांच्या किमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली होती. या निर्णयामुळे विशेषतः उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांना आधुनिक सुविधा असलेली घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची संधी मिळाली असून त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला आहे.
म्हाडाच्या घरांसाठी मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईकरांचा म्हाडावरील वाढता विश्वास आणि परवडणाऱ्या घरांसाठीची तीव्र गरज अधोरेखित करणारा ठरत आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0