मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासातील अडचणी दूर करून कामाला गती देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
मुंबई, दि. १३ :
मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासन सकारात्मक असून या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्न व लक्षवेधी सूचनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींबाबत मेघदूत शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत मंत्री देसाई बोलत होते.
या बैठकीस आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच म्हाडा पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवासी उपस्थित होते.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करून म्हाडाच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पुनर्विकास प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवून प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
तसेच नगरविकास विभागाला यासंदर्भात सविस्तर सूचना देण्यात येणार असून रहिवाशांच्या हिताचे निर्णय घेण्यावर शासनाचा भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0