म्हाडा पुणे मंडळाच्या ७९२ सदनिकांसाठी संगणकीय सोडत; १४२२ अर्जदारांचे नशीब आजमावले
म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ताथवडे गृहनिर्माण योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील ७९२ सदनिकांच्या वितरणासाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या योजनेसाठी १४२२ अर्ज प्राप्त झाले असून भविष्यात सुमारे १० हजार घरे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई, दि. २५ जून : म्हाडा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील ताथवडे गृहनिर्माण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ७९२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात पार पडली. मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. या योजनेसाठी एकूण १४२२ अर्ज प्राप्त झाले होते.
पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील गृहनिर्माण भवन कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, पुणे मंडळाने नजीकच्या काळात सुमारे १० हजार घरांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिरूर येथे चार एकर भूखंडावर गृहनिर्माण प्रकल्प विकसित केला जात असून, चाकण औद्योगिक वसाहतीजवळील खराबवाडी येथे अडीच एकर जागेवर परवडणाऱ्या घरांची उभारणी सुरू आहे.
याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत पुणे ग्रामीण भागातील खेड तालुक्यातील रोहकल आणि मुळशी तालुक्यातील नेरे येथेही गृहबांधणी प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ताथवडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिकांचे हस्तांतरण यापूर्वी पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्यातील ७९२ सदनिकांसाठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या प्रकल्पामध्ये दर्जेदार बांधकाम, आधुनिक सुविधा आणि मोक्याचे स्थान यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.
या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी २४ तर मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सोडत प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर करण्यात आले.
यावेळी म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे, कार्यकारी अभियंता मनीषा मोरे, उपमुख्य अधिकारी राहुल शिळीमकर, उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य दीपक नलावडे, दिपाली पाटील, धनंजय कुलकर्णी, मिळकत व्यवस्थापक तुषार जायभावे, रामचंद्र भोसले यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आधुनिक सुविधांनी युक्त घरे उपलब्ध करून देण्याच्या दिशेने पुणे मंडळाचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0