एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; 11 इलेक्ट्रिक स्कूटर चोरी प्रकरणांचा उलगडा, दोघांना अटक

एमआयडीसी पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या दोघांना अटक करून मुंबईतील विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या 11 इलेक्ट्रिक स्कूटर जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 6 लाख 18 हजार रुपये आहे.

Jul 30, 2026 - 17:33
 0  18
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; 11 इलेक्ट्रिक स्कूटर चोरी प्रकरणांचा उलगडा, दोघांना अटक
एमआयडीसी पोलीस, इलेक्ट्रिक स्कूटर चोरी, इलेक्ट्रिक मोटार स्कूटर, स्कूटर चोरी प्रकरण, आरोपी अटक, मुंबई गुन्हे

मुंबई ब्यूरो | अनिल सावरे 

मुंबई, दि. 30 : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने इलेक्ट्रिक मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून मुंबई शहरातील विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या तब्बल 11 इलेक्ट्रिक मोटार स्कूटर जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या स्कूटरची एकूण किंमत सुमारे 6 लाख 18 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी 20 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान साकीनाका परिसरातील एका कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटार स्कूटरची अज्ञात इसमाने चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सुमारे 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच तांत्रिक तपास करून आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या साथीदाराचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मुंबईतील मुंबई सेंट्रल, चांदिवली, चेंबूर, विक्रोळी, दादर, वाकोला, अंधेरी आणि वरळी या परिसरांसह विविध ठिकाणांहून इलेक्ट्रिक मोटार स्कूटर चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 11 इलेक्ट्रिक मोटार स्कूटर जप्त केल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 6 लाख 18 हजार रुपये आहे.

या कारवाईमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची उकल झाली असून, मुंबई शहरातील विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या एकूण नऊ इलेक्ट्रिक मोटार स्कूटरचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अशा प्रकारे एकूण 11 इलेक्ट्रिक स्कूटर हस्तगत करून एमआयडीसी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असून, आरोपींनी चोरी केलेल्या आणखी इलेक्ट्रिक स्कूटरचा शोध घेण्यासाठी तपास पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग अमित देशमुख, पोलीस उपआयुक्त पश्चिम परिमंडळ 3 दत्ता नलावडे तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई यशस्वी केली. पोलीस निरीक्षक सुनील कांदे यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पवर्त, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, अवघडे, कदम, पवार तसेच तांत्रिक मदत करणाऱ्या विशाल पिसाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.