लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा निर्णय महाराष्ट्रासाठी हास्यास्पद ठरेल : आमदार सत्यजीत तांबे
बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या प्रस्तावित निर्णयावर आमदार सत्यजीत तांबे यांनी टीका केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी हास्यास्पद ठरेल असून प्रतीकात्मक उपायांऐवजी सक्षम यंत्रणा, कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीवर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक ब्यूरो:
मुंबई, दि. २५ जून २०२६ : राज्य शासन बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावित निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवत तो महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यासाठी हास्यास्पद ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
सत्यजीत तांबे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालविवाह हा अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्न असून तो रोखण्यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, सक्षम प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक पातळीवरील देखरेख आणि व्यापक जनजागृती यांसारखे अनेक प्रभावी पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत केवळ लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे बंधनकारक करणे हा केवळ प्रतीकात्मक उपाय ठरेल.
"महाराष्ट्राने नेहमीच सामाजिक सुधारणा आणि पुरोगामी विचारांचा वारसा जपला आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या पद्धतींचे अंधानुकरण करण्याऐवजी महाराष्ट्राने स्वतःच्या विचारसरणीला साजेसे आणि परिणामकारक निर्णय घ्यायला हवेत," असे तांबे यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना, शिक्षक, पालक आणि नागरिक यांचा सक्रिय सहभाग वाढवणे अधिक गरजेचे आहे. समाजामध्ये जागृती निर्माण करून आणि विद्यमान कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करूनच या समस्येवर प्रभावीपणे मात करता येऊ शकते.
बालविवाहासारख्या संवेदनशील विषयावर शासनाने केवळ प्रतीकात्मक उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन आणि परिणामकारक धोरणे राबवावीत, अशी अपेक्षाही आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1