शिक्षण विभागाला आमदार सत्यजीत तांबे यांचा अंतिम इशारा; महिनाभरात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण प्रशासनाला अंतिम मुदत दिली आहे. पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयात झालेल्या सहा तासांच्या बैठकीत त्यांनी रखडलेल्या प्रस्तावांवर तीव्र नाराजी व्यक्त करत महिनाभरात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

May 22, 2026 - 21:55
 0  4
शिक्षण विभागाला आमदार सत्यजीत तांबे यांचा अंतिम इशारा; महिनाभरात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सत्यजीत तांबे, शिक्षण विभाग, शिक्षण आयुक्त, पुणे बैठक,

पुणे, दि. २२ मे २०२६ : विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत शिक्षण विभागाला अंतिम मुदत दिली आहे. महिनाभरात रखडलेल्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

गुरुवारी (दि. २१ मे) पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात राज्याचे शिक्षण आयुक्त सुचेंद्र प्रतापसिंह यांच्या उपस्थितीत तब्बल सहा तास मॅरेथॉन बैठक पार पडली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी जवळपास ६ वाजेपर्यंत सुरू होती.

या बैठकीत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्था तसेच विविध प्रशासकीय स्तरांवरील प्रलंबित विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागातील रखडलेल्या प्रस्तावांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “बैठका पुरेशा झाल्या, आता निर्णय आणि अंमलबजावणी हवी,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी प्रशासनाला इशारा दिला.

२५ मेचे आंदोलन महिनाभर पुढे

दरम्यान, शिक्षण आयुक्तांकडून वेळ मागण्यात आल्यानंतर २५ मे रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेले धरणे आंदोलन महिनाभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, प्रशासनाला देण्यात आलेली ही अंतिम मुदत असल्याचे स्पष्ट करत आमदार तांबे म्हणाले, “महिनाभरात सर्व प्रलंबित कामांवर ठोस निर्णय झाले पाहिजेत. त्यानंतर कोणतीही सबब स्वीकारली जाणार नाही.”

शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर कार्यवाही होऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्थांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा संबंधित घटकांकडून व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0