एसटी महामंडळ उभारणार राज्यभरात २०० ई-चार्जिंग स्टेशन; २०३५ पर्यंत सर्व बसेस ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्यभरात सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.

May 12, 2026 - 02:45
 0  21
एसटी महामंडळ उभारणार राज्यभरात २०० ई-चार्जिंग स्टेशन; २०३५ पर्यंत सर्व बसेस ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार
एसटी महामंडळ, ई-बसेस, चार्जिंग स्टेशन, प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य शासन आणि एसटी महामंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, भविष्यात एसटी महामंडळाच्या सुमारे २० हजार ई-बसेससाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्यभरातील एसटीच्या उपलब्ध जागांवर आधुनिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत संबंधित विकासकांना ठराविक जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून तेथे अत्याधुनिक चार्जिंग स्टेशन उभारले जातील. या स्टेशनवर एसटीच्या ई-बसेसना चार्जिंग सुविधा देण्यात येईल. याशिवाय विकासकांना सुमारे १५०० चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून खासगी इलेक्ट्रिक वाहनांनाही चार्जिंग सुविधा देण्यास परवानगी असेल.

या माध्यमातून एसटी महामंडळाला कमी खर्चात चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार असून जागेचे भाडे आणि खासगी वाहनांच्या चार्जिंगमधून मिळणाऱ्या महसुलातील काही हिस्सा महामंडळाला मिळणार आहे.

या सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून पर्यावरणपूरक आणि आधुनिक परिवहन व्यवस्थेकडे एसटी महामंडळाची वाटचाल अधिक वेगाने होणार असल्याचा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 6
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0