एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम; उत्कृष्ट चालकांना प्रोत्साहन, आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित होणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभर डिझेल बचत मोहीम राबविण्यात येणार आहे. डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन देण्यात येणार असून प्रत्येक आगारासाठी डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मधील वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभरात डिझेल बचतीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. “इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती” या संकल्पनेअंतर्गत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सध्या एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी राज्यभरातून दररोज किमान एक हजार लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत जवळपास दररोज एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
“लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक आगाराकडून बसच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
डिझेल बचतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यांना प्रोत्साहनपर भत्ताही दिला जाणार आहे. तसेच निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत करणाऱ्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन डिझेल बचतीची मोहीम अधिक प्रभावी होईल, असा विश्वास परिवहन मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे केपीएल (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी येत असेल, अशा चालकांचे समुपदेशन आणि पुनर्प्रशिक्षण केले जाणार आहे.
इंधन बचतीसाठी चालकांना वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, योग्य ब्रेकिंग पद्धतीचा अवलंब याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याशिवाय बसेसची नियमित तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची पाहणी यावरही भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
टायर प्रेशर, इंजिन ट्यूनिंग, ऑईल गळती, ब्रेक प्रणालीतील त्रुटी यामुळेही इंधनाचा अपव्यय होत असल्याने कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी आणि इंधन खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

