बेस्ट बसमधील प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३ गुन्हे उघड, १३६ मोबाईल जप्त
मुंबईतील बेस्ट बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या कारवाईत तीन मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे १२ लाख ६६ हजार रुपयांचे १३६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
मुंबई, दि. ३ : बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे बेस्ट बसमधील मोबाईल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून सुमारे १२ लाख ६६ हजार रुपये किमतीचे तब्बल १३६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे एका ५९ वर्षीय व्यक्ती हे ६ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास सिप्झ बस स्टॉप, एमआयडीसी सेंट्रल रोड, अंधेरी पूर्व येथून अंधेरी स्टेशनकडे जाणाऱ्या बेस्ट बस क्रमांक ४७९ मधून प्रवास करीत होते.
प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पँटच्या डाव्या खिशातून सुमारे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बेस्ट बसमध्ये वारंवार होणाऱ्या मोबाईल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेतली. या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पथकाने परिसरातील सुमारे ४० ते ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अंधेरी परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल चोरीच्या टोळीतील तिघा आरोपींना अटक केली. आरोपींकडे सखोल चौकशी केल्यानंतर बेस्ट बसमधील मोबाईल चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले.
या कारवाईत बेस्ट बसमधील मोबाईल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून विविध कंपन्यांचे एकूण १३६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे १२ लाख ६६ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबई शहरातील विविध भागांत बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरणारी टोळी अटक झाल्याने अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे. तसेच, चोरीस गेलेले मोबाईल संबंधित मालकांना परत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग डॉ. अभिषेक देशमुख, पोलीस उपआयुक्त, पश्चिम परिमंडळ-३ दत्ता बाळाडे, तसेच अंधेरी विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, गुन्हे सुनील करांडे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0