मुंबईच्या खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवण्याची क्षमता; महापौर रितू तावडे यांचा विश्वास
मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा २०२६ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील खेळाडूंमध्ये ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याची क्षमता असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच महापौर स्पर्धांच्या निधीत वाढ करून तो पाच कोटी रुपयांपर्यंत नेण्याची घोषणाही करण्यात आली.
मुंबई, दि. २५ : मुंबईतील खेळाडूंमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकून तिरंगा फडकावण्याची क्षमता असल्याचा विश्वास मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्त केला. होतकरू आणि गुणवंत खेळाडूंच्या पाठीशी बृहन्मुंबई महानगरपालिका कायम खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मुंबई महापौर चषक पॉवरलिफ्टिंग स्पर्धा – २०२६’ दादर पश्चिम येथील कीर्ती महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात महापौर रितू तावडे बोलत होत्या.
यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत महापौर क्रीडा स्पर्धांसाठीच्या निधीत वाढ करून विविध स्पर्धांसाठी एकूण पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास, आधुनिक सुविधा आणि गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी क्रीडा मैदानांचा विकास, आधुनिक व्यायाम साहित्य आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
महिला खेळाडूंच्या दमदार सहभागाचे कौतुक
या स्पर्धेत १०० पुरुष आणि ४७ महिला खेळाडूंनी विविध वजनी गटांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. महिलांचा वाढता सहभाग पाहून महापौरांनी विशेष समाधान व्यक्त केले.
"आजची महिला केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करत आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते खेळाडू तसेच नवोदित खेळाडूंचा सहभाग पाहून मुंबई आणि महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वतः माजी खो-खो खेळाडू असल्याचा उल्लेख करत महापौरांनी खेळाडूंना पराभवाची भीती न बाळगता अधिक जोमाने पुढे जाण्याचा सल्लाही दिला.
स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया रुबी दास यांच्या खेळाडूवृत्तीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदनही केले.
या स्पर्धेत एकूण १४७ खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यामध्ये १०० पुरुष आणि ४७ महिला खेळाडूंचा समावेश होता. तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते आजी-माजी खेळाडू व प्रशिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेतील विजेते
पुरुष गट :
• सब ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय – आयर्न मॅटर (मुंबई शहर)
• ज्युनिअर स्ट्रॉंग बॉय – विराज पावसकर (उपनगर मुंबई)
• सीनियर स्ट्रॉंग मॅन – योगेश गुंड (मुंबई शहर)
• मास्टर स्ट्रॉंग मॅन – राजेश शेटे (मुंबई शहर)
महिला गट :
• सब ज्युनिअर गर्ल – सेजल बेलवलकर (उपनगर मुंबई)
• ज्युनिअर स्ट्रॉंग गर्ल – तन्वी शिंदे (मुंबई शहर)
• सीनियर स्ट्रॉंग वुमन – सेजल मकवाना (उपनगर मुंबई)
• मास्टर स्ट्रॉंग वुमन – रुबी दास (मुंबई शहर)
मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशनने या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करत मुंबईतील क्रीडा संस्कृतीला नवी ऊर्जा दिल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1