मुंबईकरांच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण; महापौर रितू तावडे यांची माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. केईएम रुग्णालयातील NICU, मॅमोग्राफी मशीन तसेच धारावीतील बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्रामुळे मुंबईकरांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईकरांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक उपकरणांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम) येथे विविध वैद्यकीय विभागांचे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये केईएम रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), अत्याधुनिक मॅमोग्राफी मशीन, सर्जिकल पॅथोलॉजी सेमिनार सभागृह आणि फिजिओलॉजी सेमिनार सभागृहाचा समावेश आहे. याशिवाय लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्न धारावी येथील लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्राचेही लोकार्पण करण्यात आले.
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, अत्याधुनिक उपकरणांमुळे मुंबईकरांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी सुविधा विशेष लाभदायक ठरणार आहे. स्तनाच्या कर्करोगाचे वेळेत निदान होण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवजात शिशू अतिदक्षता विभागामुळे अकाली जन्मलेली किंवा विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज असलेल्या बालकांना अधिक प्रभावी उपचार मिळणार आहेत. तसेच संसर्ग नियंत्रण आणि बालकांची देखरेख अधिक सक्षम होणार असल्याचेही सांगण्यात आले.
धारावीतील नव्या केंद्रामध्ये ६ रुग्णशय्या, डे-केअर केमोथेरपी कक्ष आणि आंतररुग्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लांट सेवा उपलब्ध करून देणारे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पहिले महानगरपालिका रुग्णालय असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाला हरिष भांदिर्गे, किरण तावडे, अर्चना शिंदे, शरद उघडे, डॉ. शैलेंद्र मोहिते, डॉ. प्रमोद इंगळे, डॉ. हरिश पाठक तसेच ‘वेहा फाऊंडेशन’च्या रुमाना हमीद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0