मुंबईतील पर्जन्य जल उदंचन केंद्रांची लोकप्रतिनिधींकडून पाहणी; सखल भागांतील पाणी निचऱ्यासाठी सर्वंकष आराखडा केंद्राकडे
मुंबईत पावसाळ्यापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर रितू तावडे, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अमीत साटम यांनी रे रोड, वरळी आणि क्लिव्हलँड येथील पर्जन्य जल उदंचन केंद्रांची पाहणी केली. सखल भागांतील पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेने सर्वंकष कृती आराखडा केंद्र सरकारकडे सादर केला आहे.
मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचू नये आणि जलद निचरा व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने महापौर रितू तावडे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अमीत साटम यांनी रे रोड येथील ब्रिटानिया, वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड पर्जन्य जल उदंचन केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या दौऱ्यात महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, स्थायी समिती सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यापूर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना नालेसफाई, रस्ते विकास आणि पर्जन्य जल व्यवस्थापनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आमदार अमीत साटम यांनी सांगितले की, मुंबईची भौगोलिक रचना लक्षात घेऊन सखल भागांमध्ये पाणी साचू नये यासाठी महानगरपालिकेने भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT मुंबई) मदतीने सर्वंकष कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून केंद्रीय निधीतून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, मुसळधार पाऊस आणि भरतीच्या काळात साचलेले पाणी उदंचन संचांच्या सहाय्याने समुद्रात सोडले जाते. ओहोटीच्या काळात पूर नियंत्रक दरवाजे उघडून पाण्याचा नैसर्गिक निचरा केला जातो. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नाल्यांमध्ये येऊ नये यासाठी विशेष पूर नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे.
सध्या मुंबईत हाजी अली (महालक्ष्मी), इर्ला (जुहू), लव्हग्रोव्ह (वरळी), क्लिव्हलँड (वरळी गाव), ब्रिटानिया (रे रोड) आणि गझदरबंध (सांताक्रूझ) अशी सहा पर्जन्य जल उदंचन केंद्रे कार्यरत आहेत. माहुल (चेंबूर) आणि मोगरा (वेसावे) येथील दोन नवीन केंद्रांची कामे प्रगतीपथावर आहेत.
महानगरपालिकेने मुंबईत विविध ठिकाणी ५५० हून अधिक पाणी उपसा करणारे उदंचन संच तैनात केले असून नाले आणि नद्यांच्या स्वच्छतेची कामेही वेगाने सुरू आहेत. समुद्रात जाणारा घनकचरा आणि तरंगता कचरा रोखण्यासाठी प्रशासनाला विशेष निर्देश देण्यात आल्याचे आमदार अमीत साटम यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1