नागपाडा हत्याकांडातील दोन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची नागपूरमध्ये कारवाई
मुंबईतील नागपाडा हत्याकांड प्रकरणी गुन्हे शाखेने दोन आरोपींना नागपूरमधून अटक केली. ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येनंतर आरोपी फरार झाले होते.
मुंबई ब्यूरो | अनिल सावरे
मुंबई, दि. २५ एप्रिल : नागपाडा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, २० एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ७८ वर्षीय मोहम्मद इक्बाल सलीया यांची त्यांच्या नागपाडा येथील राहत्या घरी चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू असताना आरोपी क्रमांक १ (वय २९) आणि त्याचा साथीदार आरोपी क्रमांक २ (वय २५) यांनी हा गुन्हा केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. गुन्ह्यानंतर दोन्ही आरोपींनी मोबाईल फोन बंद करून मुंबईबाहेर पळ काढला होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे शोधमोहीम राबवून २४ एप्रिल रोजी बडा ताजबाग परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात आरोपी क्रमांक १ हा पूर्वीच्या कुप्रसिद्ध गँगस्टर सादिक कालिया (१९९७) आणि आरिफ कालिया (२००२) यांचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीने आपल्या नातेवाईकांविरुद्ध पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयातून आरोपीने मनात राग धरून आपल्या साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
