मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांतून विनम्र अभिवादन

आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ असे नामकरण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले.

Aug 4, 2026 - 19:57
Aug 22, 2026 - 18:41
 0  2
मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांतून विनम्र अभिवादन
नाना शंकरशेट, नाना शंकरशेट पुण्यतिथी, मुंबईचे शिल्पकार, जगन्नाथ शंकरशेट,

मुंबई प्रतिनिधी – मिलिंद कारेकर : आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार, समाजसुधारक आणि शिक्षणप्रेमी जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांचे भावपूर्ण पुण्यस्मरण करण्यात आले. नानांच्या स्मृतींशी जोडलेल्या ऐतिहासिक स्थळांवर नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नानाप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ असे करण्यासाठी महापालिका आणि प्रशासकीय स्तरावर विशेष पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले. नाना शंकरशेट यांनी मुंबईच्या जडणघडणीत दिलेले ऐतिहासिक योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मृतीला योग्य सन्मान मिळावा, या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाना शंकरशेट चौकात पुतळ्यास पुष्पहार

नाना शंकरशेट चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंके आणि स्थानिक नगरसेवक ॲड. गौरंग जव्हेरी प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी नाना शंकरशेट यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक कार्याचे स्मरण केले. आधुनिक मुंबईच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

मध्य रेल्वे मुख्यालयात रेल्वे क्षेत्रातील योगदानाचे स्मरण

मध्य रेल्वेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागावर असलेल्या नाना शंकरशेट यांच्या ऐतिहासिक कोरीव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुंबईतील रेल्वे विकास आणि देशातील रेल्वे वाहतुकीच्या प्रगतीसाठी नाना शंकरशेट यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यात आला.

मुंबईच्या विकासासाठी त्यांनी विविध क्षेत्रांत केलेले कार्य आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका यांचे स्मरण उपस्थितांनी केले.

महापालिका मुख्यालयात तैलचित्रास अभिवादन

मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात असलेल्या नाना शंकरशेट यांच्या तैलचित्रास उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त संजोग कबरे आणि महापालिका सचिव मनोज कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी नाना शंकरशेट यांनी मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन शहराच्या विकासासाठी कार्य करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

एशियाटिक सोसायटी येथे भव्य पुतळ्यास पुष्पहार

एशियाटिक सोसायटी येथे असलेल्या नाना शंकरशेट यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि समिती सदस्यांनी उपस्थित नानाप्रेमींचे उत्साहात स्वागत केले.

या पुण्यस्मरण सोहळ्यास अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस ॲड. मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर, दिनकर बायकेरीकर, डॉ. विवेक रायकर, रविंद्र माहिमकर, विजय पितळे, दिलीप मालांडकर यांच्यासह शंकरशेट कुटुंबीय आणि मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाना शंकरशेट यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, सार्वजनिक सुविधा आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या विविध कार्यक्रमांमधून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले आणि त्यांचा वैचारिक व सामाजिक वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.