लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा; भोंदू व साथीदाराला अटक, महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नांना यश

नाशिकमध्ये लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ७७ हजार रुपये उकळून स्मशानात अघोरी पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने तक्रार दाखल झाल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी भोंदू व त्याच्या साथीदाराला अटक केली.

Aug 22, 2026 - 17:52
 0  7
लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा; भोंदू व साथीदाराला अटक, महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नांना यश
नाशिक भोंदूगिरी, अघोरी पूजा, अंधश्रद्धा निर्मूलन, महाराष्ट्र अंनिस, भद्रकाली पोलीस, जादूटोणा विरोधी कायदा, नाशिक गुन्हा, भोंदूला अटक,

नाशिक ब्यूरो:

नाशिक : लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवून गुजरातमधील एका महिलेकडून तब्बल ७७ हजार रुपये उकळल्याचा आणि नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) प्रयत्नांनंतर भद्रकाली पोलिसांनी पंचवटीतील कथित भोंदू विशाल रामदास खडांगळे आणि त्याचा साथीदार जितू अण्णाराव पवार यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

अंनिसच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला गुजरातमधील

बलसाड येथे राहत होती. तिची नाशिक येथील नात्यातील जितू अण्णाराव पवार याच्याशी सुमारे चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि जितूने तिच्याशी विवाह करण्यास होकार दिला. मात्र काही काळानंतर त्याने लग्नास नकार दिल्याचा आरोप आहे. याबाबत विचारणा केली असता त्याने महिलेला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

लग्न जमवून देण्याचे भोंदूने दिले आश्वासन

जितू पवार हा नाशिकच्या फुलेनगर परिसरातील विशाल रामदास खडांगळे याच्यासोबत कथित भगतगिरी करत असल्याचे महिलेच्या निदर्शनास आले. महिलेने भोंदू खडांगळे याच्याकडे जितूबाबत तक्रार केल्यानंतर तिला नाशिकला बोलावण्यात आले.

जितू तिच्याशी व्यवस्थित वागेल आणि दोघांचे लग्न निश्चित होईल, असे आश्वासन खडांगळे याने महिलेला दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्न जमवून देण्याच्या नावाखाली विविध पूजा आणि विधी करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मध्यरात्री स्मशानात अघोरी पूजा

महिलेला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री बोलावण्यात आले. तेथे अघोरी पूजा करण्याचा बहाणा करण्यात आला. प्रेत जाळण्याच्या ठिकाणी महिलेला बसवून जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या तिच्या अंगावर मंत्रोच्चार करण्याच्या बहाण्याने फेकण्यात आल्याचा आरोप आहे.

काही लिंबू गोदावरी नदीत टाकण्यात आले, तर काही लिंबू प्रेत ठेवण्यासाठी असलेल्या लोखंडी जाळीवर ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाइन पद्धतीने ७७ हजार रुपये घेतल्याचा आरोप

अघोरी पूजेच्या नावाखाली संबंधित भोंदूने महिलेकडून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या रकमा स्वीकारल्याचा आरोप आहे. एकूण ७७ हजार रुपये घेतल्यानंतरही महिलेचे लग्न झाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पूजेच्या नावाने दिलेले पैसे परत मागितले.

मात्र पैसे परत मागितल्यानंतर भोंदू आणि त्याच्या साथीदाराने महिलेला दमदाटी तसेच मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

अंनिसच्या कार्यकर्त्यांची मदत

दरम्यान, महिलेला नाशिकमधील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क क्रमांक मिळाला. तिने कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली संपूर्ण आपबीती सांगितली. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिलेला सोबत घेऊन तातडीने भद्रकाली पोलीस ठाणे गाठले.

संबंधित भोंदू आणि त्याच्या साथीदाराची चौकशी करून उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करावी आणि दोषींवर जादूटोणाविरोधी कायद्यासह इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलिसांना देण्यात आले.

पोलिसांकडून दोघांना अटक

तक्रारीची आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर भद्रकाली पोलिसांनी संबंधित भोंदू आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा तसेच अन्य लागू कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिराजउद्दीन शेख करीत आहेत.

अंनिसच्या प्रयत्नांना यश

या प्रकरणात पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आदींनी प्रयत्न केले.

अंनिसच्या म्हणण्यानुसार, खरात प्रकरणानंतर नाशिकमध्ये भोंदूगिरीसंदर्भातील हा १२ वा गुन्हा दाखल झाला आहे. राज्यातील भोंदूगिरीच्या गुन्ह्यांमध्ये नाशिकचा वाटा सुमारे १५ टक्के असल्याचा दावाही समितीने केला आहे. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात जनजागृती तसेच कठोर कायदेशीर कारवाईची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.