२० मे रोजी औषध विक्रेत्यांच्या बंदची हाक; नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून संयम राखावा

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या २० मे २०२६ रोजीच्या बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

May 18, 2026 - 18:38
 0  2
२० मे रोजी औषध विक्रेत्यांच्या बंदची हाक; नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून संयम राखावा
औषध दुकाने बंद, नाशिक मेडिकल बंद, औषधांचा साठा, अन्न व औषध

नाशिक ब्युरो :

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ २० मे २०२६ रोजी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा साठा आगाऊ करून ठेवत शांतता आणि संयम राखावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त (औषधे) नाशिक विभागाचे अ. तु. बर्डे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. या बंदमुळे शहर आणि जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. औषध दुकानदारांना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून परवाने देण्यात आलेले असून रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे आणि आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही सह आयुक्त अ. तु. बर्डे यांनी केले आहे.

रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0