नाशिक अपघातप्रकरणी दोषींवर कडक कारवाई; ठेकेदार असो वा अधिकारी, कोणाचीही गय नाही : मंत्री गिरीश महाजन

नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत खड्डे व चिखलामुळे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीचे आदेश देत दोषी ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

नाशिक अपघातप्रकरणी दोषींवर कडक कारवाई; ठेकेदार असो वा अधिकारी, कोणाचीही गय नाही : मंत्री गिरीश महाजन
नाशिक अपघात, नाशिक खड्डे, निलेश कोतकर मृत्यू, गिरीश महाजन,

नाशिक ब्युरो : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर खड्डे आणि चिखलामुळे झालेल्या अपघातात कामटवाडा येथील व्यावसायिक निलेश प्रसाद कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अपघातास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल. संबंधित ठेकेदार असो अथवा अधिकारी, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सेलो पॉइंट चौक ते प्रणय स्टॅम्पिंग कंपनी या दरम्यानच्या रस्त्यावर मोठे खड्डे आणि चिखल असल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. निलेश कोतकर हे दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून जेवणासाठी घरी जात होते. यावेळी रस्त्यावरील चिखल आणि खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करत असताना बाजूने जाणाऱ्या ट्रकचा त्यांना धक्का लागला. धडकेनंतर ते रस्त्यावर कोसळले.

या अपघातात कोतकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडून माहिती घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. अपघात नेमका कशामुळे घडला, त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीत कोणत्या स्तरावर हलगर्जीपणा झाला, याची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. घटनेची सखोल चौकशी करून त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. संबंधित ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील, कोणाचीही गय केली जाणार नाही,” असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शनिवारी नाशिक येथे कुंभमेळ्याच्या नियोजनासह विविध विकासकामांबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आज घडलेल्या अपघाताच्या घटनेवरही सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही महाजन यांनी सांगितले.

या दुर्घटनेमुळे नाशिक महापालिकेच्या रस्ते दुरुस्ती आणि देखभाल कामातील कथित हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू असल्याचा दावा करण्यात येत असून, शेकडो नागरिक विविध अपघातांमध्ये जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोतकर यांच्या मृत्यूनंतर नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि विकासकामांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवरील खड्डे, चिखल आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच रस्त्याच्या दुरुस्ती व देखभालीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.