सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिक नावलौकिक उंचावणार; नियोजनाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्याकडून कौतुक
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या तयारीचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आढावा घेतला. कुंभमेळ्याच्या नियोजनाचे कौतुक करत त्यांनी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर दिला.
प्रतिनिधी नाशिक : शुभांगी शिंदे
नाशिक, दि. 28 : पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा जागतिक स्तरावर नावलौकिक अधिक उंचावेल, असा विश्वास राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे त्यांनी विशेष कौतुक करत विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत राज्यपालांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून नाशिकच्या पर्यटन, संस्कृती आणि आर्थिक विकासासाठी मोठी संधी आहे. या भव्य सोहळ्यामुळे देश-विदेशातील कोट्यवधी भाविक नाशिकला भेट देतील आणि शहराची जागतिक ओळख अधिक मजबूत होईल.
ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या प्रभावी वापरामुळे वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, माहिती प्रसारण आणि आपत्कालीन सेवांचे नियोजन अधिक सक्षमपणे करता येईल. सामाजिक माध्यमांमुळे कुंभमेळ्याबाबतची माहिती वेगाने पोहोचत असल्याने यावेळी भाविकांची संख्या विक्रमी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यपालांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, आरोग्य, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या अनुभवांचा अभ्यास करून त्यानुसार नियोजन अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जात असून, रस्ते, मलनिस्सारण व्यवस्था, वाहतूक, पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन विकासकामांनाही प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि आयुक्त शेखर सिंह यांनी कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला. तर महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकाल पथ, मलनिस्सारण प्रकल्प आणि शहरातील विविध पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती दिली.
राज्यपालांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत सिंहस्थ कुंभमेळा 2027 हा देशातील सर्वोत्कृष्ट आणि संस्मरणीय धार्मिक सोहळा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1