सिंहस्थ कुंभमेळा २०२७: नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणानिमित्त नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन. २५ ऑक्टोबरला ५०१ जणांचा शंखनाद, तर ३१ ऑक्टोबरला रामकुंडावर सामूहिक गोदा आरती.
नाशिक ब्यूरो:
२५ ऑक्टोबरला ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद; ३१ ऑक्टोबरला रामकुंडावर हजारो जनजाती बांधवांकडून गोदा आरती
नाशिक, प्रतिनिधी : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी दोन विश्वविक्रमांचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. याअंतर्गत २५ ऑक्टोबर रोजी यशवंत महाराज पटांगण येथे ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद, तर ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी रामकुंड येथे हजारो जनजाती बांधवांच्या सहभागातून सामूहिक गंगा-गोदावरी आरती आयोजित करण्यात येणार आहे. ही माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भक्तिचरण दास महाराज, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे जयवंत गायधनी आणि गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव आदी उपस्थित होते.
२५ ऑक्टोबरला ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद
सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदेश जिल्ह्यातील गावागावांत पोहोचविण्यासाठी सेवाभावी संस्था, विविध समित्या आणि नागरिकांच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पहिला विश्वविक्रम अनंत विजय शंखनाद ग्रुपच्या सहकार्याने २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत यशवंत महाराज पटांगण येथे आयोजित करण्याचे नियोजन आहे. यावेळी ५०१ जण एकत्रितपणे शंखनाद करणार आहेत.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळीही शंखनाद करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
रामकुंडावर हजारो जनजाती बांधवांकडून गोदा आरती
दुसऱ्या उपक्रमांतर्गत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सहकार्याने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी रामकुंड येथे सामूहिक गंगा-गोदावरी आरती आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जनजाती बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, गावागावांत प्रशिक्षण आणि नियोजन सुरू आहे.
आरतीसाठी अहिल्याबाई होळकर पुलापासून रामकुंड परिसरापर्यंतचा भाग राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सात तालुक्यांतील ६५० गावांचा सहभाग
गोदा आरतीचे समन्वयक प्रदीप बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ६५० गावांतील तसेच नाशिक शहरातील २८ वस्त्यांमधील नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. जनजाती बांधवांकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.
या सामूहिक आरतीसाठी आतापर्यंत ६ हजार ५५९ जणांची नोंदणी झाल्याची माहिती जयवंत गायधनी यांनी दिली. शंखनाद कार्यक्रमासंदर्भातील माहिती श्रीमती वृषाली यांनी दिली.
रामकुंड परिसराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेचे सहकार्य
महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकुंड घाट आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासह कार्यक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य महापालिकेकडून करण्यात येईल, असे सांगितले. भाविकांची संभाव्य गर्दी आणि कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेऊन परिसराची स्वच्छता व व्यवस्थापन यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या दोन्ही उपक्रमांच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, लोकसहभाग आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचे नियोजन आहे.
Mi Marathi Live — स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज!