नाशिकमध्ये वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती कायम; अत्यावश्यक प्रकरणात परवानगीसाठी अर्जाची मुभा
नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाने दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. अत्यावश्यक परिस्थितीत झाड तोडणे किंवा छाटणीसाठी लवादाकडे परवानगी मागण्याची मुभा देण्यात आली असून पुढील सुनावणी १९ जून २०२६ रोजी होणार आहे.
नाशिक ब्यूरो
नाशिक : नाशिक शहरातील वृक्षतोडीवर हरित लवादाने दिलेली स्थगिती कायम ठेवली आहे. मनीष बाविस्कर विरुद्ध नाशिक महानगरपालिका या प्रकरणाच्या सुनावणीत महानगरपालिकेने स्थगिती आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र लवादाने ती मागणी मान्य न करता स्थगिती कायम ठेवली.
आज झालेल्या सुनावणीत नाशिक महानगरपालिकेकडून दिल्लीतील वकिलांची टीम उपस्थित होती. तसेच अपघातग्रस्त म्हणून आलेल्या अर्जदारांकडून आणि फ्रॉव्हसी अकॅडमीचे रतन लथ यांच्या वतीने महानगरपालिकेला मदत करण्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला होता.
मात्र अर्जदार मनीष बाविस्कर यांच्यावतीने वकील अॅड. श्रीराम पिंगळे यांनी या अर्जांना जोरदार विरोध केला. संबंधित अर्जदारांना महानगरपालिकेने उभे केले असून ते दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर हरित लवादाने दोन्ही अर्ज फेटाळून लावले.
आपत्कालीन परिस्थितीत परवानगीची मुभा
महानगरपालिकेकडून झाडे पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने आपत्कालीन परिस्थितीत झाड तोडणे किंवा छाटणी करण्यासाठी स्थगिती आदेशात सुधारणा करण्याची विनंती करण्यात आली होती.
यावर लवादाने अशा अत्यावश्यक प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणेला हरित लवादाकडे स्वतंत्र अर्ज करून परवानगी मागता येईल, एवढीच मर्यादित सवलत दिली.
आयुक्तांसह अधिकाऱ्यांना नोटीस
अर्जदार मनीष बाविस्कर यांनी ७ एप्रिलनंतरही झालेल्या कथित वृक्षतोडीविरोधात स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, उद्यान अधिकारी विवेक भदाणे यांच्यासह संबंधित जबाबदार व्यक्तींना दोन आठवड्यांत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील सुनावणी १९ जूनला
या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जून २०२६ रोजी होणार आहे. सदर प्रकरणात अॅड. श्रीराम पिंगळे यांच्यासोबत अॅड. विकास अगरवाल यांनीही काम पाहिले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0