प्रभाग क्रमांक ६ मधील समस्यांवर संतप्त महिलांचा आवाज; मनपा आयुक्तांच्या घरावर मोर्चाचा इशारा
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मधील रस्ते, पाणी, कचरा आणि ड्रेनेज समस्यांमुळे संतप्त झालेल्या महिलांनी मनपा आयुक्तांनी तातडीने दौरा करावा, अन्यथा त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक ब्युरो :
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यांची दुरवस्था, तुटलेले ड्रेनेज, पाणीटंचाई, कचऱ्याचे ढीग तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता थेट मनपा आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
प्रभाग क्रमांक ६ हा ग्रामीण व शेतीप्रधान भाग असून अनेक वर्षांपासून येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. “महात्मा गांधी यांनी दिलेला ‘खेड्याकडे चला’ हा संदेश या भागात खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळतो. आता हा प्रभाग सोडून खेड्यात जावे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात रस्ते खणलेले असून ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. तसेच पाणी आणि वीज समस्याही गंभीर बनल्या आहेत. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ना कार्यालयात भेटतात ना फिल्डवर, आणि भेटले तरी समाधानकारक उपाययोजना होत नसल्याची तक्रार महिलांनी केली.
या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत आपल्या समस्या मांडल्या. “निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्या घरोघरी आला होतात. आम्ही तुम्हाला मते दिली, आता आमच्या समस्या सोडवा,” असा सवाल महिलांनी केला.
“नगरसेवक निधी नसल्याचे सांगतात. मग आम्ही कर का भरायचा? जर प्राथमिक सुविधाच मिळत नसतील तर विकास निधी जातो कुठे?” असा संतप्त सवालही महिलांनी उपस्थित केला.
महिलांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नगरसेवकांसह संपूर्ण प्रभागाचा दौरा करून समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली आहे. “एसीमध्ये बसून समस्या सुटणार नाहीत. अन्यथा आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढू,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी मयुरी सानप, जयश्री महाले, रजनी आहेर, काजल आव्हाड, स्नेहल झनकर, रंजना वाघ, रोहिणी रायकर, रुपाली सोनार, संगिता महाले, आरती आव्हाड, सुजाता फडोळ, सोनाली मुंडे, अंजना अहिरे, जयश्री पिंगळे, लता शेरताटे आणि शैलजा देवगिरे आदी महिला उपस्थित होत्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0