निदा खान अटकेत; नाशिक–छत्रपती संभाजीनगर पोलिसांची संयुक्त कारवाई

नाशिक शहर पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत आरोपी निदा खान हिला नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दोन दिवसांच्या विशेष ऑपरेशननंतर ही कारवाई करण्यात आली.

निदा खान अटकेत; नाशिक–छत्रपती संभाजीनगर पोलिसांची संयुक्त कारवाई
निदा खान अटक, नाशिक पोलीस, संभाजीनगर पोलीस

नाशिक ब्यूरो 

देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक १५६/२६ मधील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर नाशिक शहर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने मोठी संयुक्त कारवाई केली. सलग दोन दिवस विशेष ऑपरेशन राबवत आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

नाशिक शहर पोलीस यांच्या विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत आरोपीला नारेगाव येथील स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रवीण पवार यांनी संशयित परिसरात गुप्त पाळत ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात केली.

तपासादरम्यान पोलिसांनी मतीन पटेल याचीही चौकशी केली. आरोपीचे अचूक ठिकाण निश्चित झाल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून अत्यंत वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाई करत निदा खान हिला ताब्यात घेतले.

सदर आरोपीला आज नाशिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, आरोपींना आश्रय देणारे आणि कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या संयुक्त मोहिमेसाठी संदिप कर्णिक यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस दल तसेच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.