आषाढी शासकीय महापूजेसाठी नाशिकहून विठ्ठल-रखुमाईंची विशेष वस्त्रे पंढरपूरकडे रवाना

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने विठ्ठल-रखुमाईंसाठी नाशिकमध्ये तयार करण्यात आलेली विशेष रेशमी वस्त्रे पंढरपूरला रवाना करण्यात आली.

Jul 22, 2026 - 20:32
 0  49
आषाढी शासकीय महापूजेसाठी नाशिकहून विठ्ठल-रखुमाईंची विशेष वस्त्रे पंढरपूरकडे रवाना
आषाढी एकादशी, पंढरपूर, विठ्ठल, रखुमाई, शासकीय महापूजा, देवेंद्र फडणवीस, तुषार भोसले,

नाशिक | ब्यूरो 

आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे होणाऱ्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने अर्पण करण्यात येणारी विशेष रेशमी वस्त्रे नाशिकहून पंढरपूरकडे रवाना करण्यात आली. या वस्त्रांमध्ये श्री विठ्ठलासाठी विशेष अंगारखा, सोवळे, रेशमी शेला आणि बाजूबंद, तर श्री रखुमाईसाठी सुंदर रेशमी पैठणी तयार करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या पुढाकारातून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार नाशिक व सोलापूर जिल्ह्यातील कुशल कारागिरांनी या विशेष पोशाखाची निर्मिती केली आहे. पंढरपूरला रवाना करण्यापूर्वी हा पोशाख प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला.

गतवर्षीपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पोशाखाची रंगसंगती, कापडाची निवड आणि पारंपरिक शैलीचे काटेकोर पालन करून विठ्ठल-रखुमाईंची वस्त्रे नाशिकमध्ये तयार केली जात आहेत. यंदा तयार करण्यात आलेला हा या परंपरेतील दुसरा विशेष पोशाख आहे.

श्री विठ्ठलासाठी तयार करण्यात आलेल्या पोशाखात लाल रंगाचा रेशमी अंगारखा, त्यावर गळा, छाती आणि कंबरपट्ट्यावर आकर्षक सोनेरी जरीचे नक्षीकाम, भगव्या रंगाचा जरीबुट्टेदार रेशमी शेला, भगवे सोवळे आणि बाजूबंद यांचा समावेश आहे. संपूर्ण पोशाखावर अत्यंत बारकाईने पारंपरिक जरीकाम करण्यात आले आहे.

या पोशाखावरील नक्षीकाम आणि निर्मितीचे काम सोलापूर येथील कारागीर शुभम तिवारी यांनी श्री पांडुरंगाची सेवा म्हणून कोणतेही मानधन न घेता विनामूल्य पूर्ण केले असल्याची माहिती तुषार भोसले यांनी दिली.

श्री रखुमाईंसाठी तयार करण्यात आलेली मोरपंखी रंगाची रेशमी पैठणी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील प्रसिद्ध पैठणी कारागिरांनी विणली आहे. हिरव्या आणि लाल काठांनी सजलेली ही पैठणी पारंपरिक कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे.

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर श्री विठ्ठल आणि रखुमाई यांचे याच विशेष पोशाखातील दर्शन लाखो भाविकांना होणार असून, या पारंपरिक आणि सांस्कृतिक उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध हस्तकला परंपरेलाही विशेष गौरव प्राप्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0