तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येला न्याय; आरोपीला जन्मठेप, पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या तपासाचे कौतुक

पंतनगरमधील तीन वर्षांच्या बालकाच्या हत्येप्रकरणी आठ वर्षांनंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या तपासाचे विशेष कौतुक करण्यात आले.

Apr 16, 2026 - 19:06
Apr 16, 2026 - 21:09
 0  6
तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येला न्याय; आरोपीला जन्मठेप, पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या तपासाचे कौतुक

मुंबई ब्यूरो - अनिल सावरे 

मुंबई, दि. १५ : पंतनगर परिसरातील तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आठ वर्षांनंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावत कठोर निर्णय दिला आहे. या प्रकरणातील दोष सिद्धीसाठी पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या प्रभावी आणि चिकाटीच्या तपासाची न्यायालयाने दखल घेतली.

मुंबई सत्र न्यायालयातील कोर्ट क्रमांक ५४ चे सत्र न्यायाधीश महेश के. जाधव यांनी दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सेशन केस क्रमांक ७९/२०१८ मध्ये आरोपी नितीन कारभारी पठारे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. पंतनगर पोलिस ठाण्यात २०१७ साली दाखल झालेल्या या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यात आला.

प्रकरणानुसार, आरोपीने फिर्यादी अफसाना अमजद कुरेशी आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेवत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. किरकोळ कारणावरून त्याने त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कल्याणजवळील हाजी मलंग गड परिसरात पुरून ठेवण्यात आला. तसेच, या घटनेची माहिती दिल्यास मुलगी तमन्नालाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.

अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या या प्रकरणात पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिस निरीक्षक रणजीत जाधव यांनी बारकाईने तपास करत परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक तपशील यांची सांगड घालत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे उभे केले.

सरकारी वकील रमेश सिरोया यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीच्या गुन्ह्याची गंभीरता अधोरेखित केली. न्यायालयाने आरोपीला कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, कलम २०१ अंतर्गत पाच वर्षांची कठोर शिक्षा व १० हजार रुपये दंड, तसेच कलम ३२३ अंतर्गत एक वर्षाची साधी कैद व दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रणजीत जाधव सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असून, पोलिस उपनिरीक्षक अमिता चव्हाण यांनीही तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या निकालामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून, पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0