पार्कसाईट पोलिसांची मोठी कारवाई; सराईत घरफोडे अटकेत, ४ घरफोडी गुन्ह्यांची उकल, गावठी कट्टा व दागिने जप्त
मुंबईतील पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपींना अटक करून ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, घरफोडीचे साहित्य आणि सुमारे २.५० लाख रुपयांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई : पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठी कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्या चौकशीतून एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपींकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, घरफोडीचे साहित्य आणि चोरीस गेलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पार्कसाईट पोलीस ठाण्यात ३० मे २०२६ रोजी दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ५४९/२६ अंतर्गत घरफोडी प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला. ११ जून २०२६ रोजी मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राणू अतिक अहमद अन्सारी (वय ४०) आणि प्रशांत अशोक कुमार ठाकूर (वय ३३) अशी आहेत. आरोपींना ताब्यात घेताना त्यांच्याकडून दोन धारदार चाकू, दोन कटावण्या, दोन मोठे स्क्रू ड्रायव्हर, दोन एलईडी बॅटऱ्या तसेच चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे दोन काळ्या रंगाचे मास्क जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे आणि आणखी धारदार शस्त्रे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात आरोपींनी सन २०२५ ते २०२६ या कालावधीत पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एकूण चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. या तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे चोरीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच अंदाजे ६ लाख रुपयांचे उर्वरित दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उघडकीस आलेल्या गुन्ह्यांमध्ये गुन्हा क्रमांक ५४९/२६, ६५/२६, ८०८/२५ तसेच इतर संबंधित घरफोडी आणि शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोज शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त अभयसिंह देशमुख आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर, पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन झाडे, पोलीस उपनिरीक्षक सागर हुजरे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0