पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष तपासणी मोहीम कूलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्यांसह पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागातर्फे महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. कूलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्या आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

Aug 18, 2026 - 02:42
 0  10
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी विशेष तपासणी मोहीम कूलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्यांसह पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी; नागरिकांना खबरदारीचे आवाहन
पिंपरी चिंचवड महापालिका, डेंग्यू प्रतिबंध, मलेरिया प्रतिबंध, डेंग्यू तपासणी मोहीम, मलेरिया तपासणी,

प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ : पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महापालिका मुख्य इमारतीसह संपूर्ण आवारातील कूलर, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. 

डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करण्यावर भर

डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यापेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह सर्व शासकीय आणि सार्वजनिक आस्थापनांच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.

तपासणीदरम्यान कूलरमधील पाणी, कुंड्यांखालील ट्रे, पाण्याच्या टाक्या, वापरात नसलेली भांडी, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, कार्यालयीन परिसर, वाहनतळ तसेच इतर ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी करण्यात आली.

ज्या ठिकाणी पाणी साचलेले आढळून आले, तेथील पाणी तत्काळ काढून टाकण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. भविष्यात पुन्हा पाणी साचणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.

कार्यालयीन परिसराचीही नियमित पाहणी करण्याच्या सूचना

आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या पथकांनी महापालिका मुख्यालयातील विविध विभाग, कार्यालयीन परिसर, वाहनतळ आणि आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली. यावेळी डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याबरोबरच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महापालिका प्रशासनाकडून डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक तपासणी मोहीम वेळोवेळी राबविण्यात येणार असून, सार्वजनिक ठिकाणी पाणी साचणार नाही यासाठी सातत्याने पाहणी केली जाणार आहे.

नागरिकांनीही पाणी साचू न देण्याचे आवाहन

पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह कार्यालय आणि परिसराची नियमित पाहणी करून कुठेही पाणी साचलेले नाही, याची खात्री करावी.

कूलर, कुंड्या, कुंड्यांखालील ट्रे, पाण्याच्या टाक्या, वापरात नसलेली भांडी आणि अन्य वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

घर, कार्यालय आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच पावसाचे पाणी साचणाऱ्या संभाव्य ठिकाणांची नियमित तपासणी केल्यास डासांची उत्पत्ती रोखण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे ‘पाणी साचू देऊ नका, डासांची उत्पत्ती रोखा आणि डेंग्यू-मलेरियापासून सुरक्षित राहा’, असा संदेश महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.