पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराची विक्रमी वसुली; ६१० कोटींचा कर जमा
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. शहरातील ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्तांपैकी ५ लाख ९ हजार २०० मालमत्ता धारकांनी कर भरला.
प्रतिनिधी:रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६ (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मालमत्ता कर वसुलीत विक्रमी कामगिरी केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सहामाहीत तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे.
शहरातील मालमत्ता धारकांकडून कर भरण्यास मिळत असलेल्या प्रतिसादामुळे कर वसुलीचा आलेख वाढत असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कराचा भरणा केला असून, ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र वापराच्या तसेच मोकळ्या जमिनी अशा विविध प्रकारच्या एकूण ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यापैकी ५ लाख ९ हजार २०० मालमत्ता धारकांनी, म्हणजेच तब्बल ६६.४७ टक्के नागरिकांनी पहिल्या सहामाहीत मालमत्ता कराचा भरणा केला आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. गतवर्षी विविध उपक्रम आणि जनजागृती मोहिमा राबविण्यासोबतच थकबाकीदारांविरोधात जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटिसा बजावणे आणि थकबाकीदारांच्या नावांची वृत्तपत्रांमध्ये यादी प्रसिद्ध करणे यांसारख्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
यंदाच्या वर्षी कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत असून, महिला बचत गटांच्या माध्यमातूनही नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे करदात्यांपर्यंत माहिती पोहोचवून वेळेत कर भरण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधेला नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, कर संकलनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होत आहे.
महापालिकेच्या या विक्रमी कर वसुलीमुळे आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीतही कर संकलनाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी उपलब्ध कर सवलतींचा लाभ घेत आपला मालमत्ता कर वेळेत भरावा आणि महापालिकेच्या विविध विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.