सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडवा; प्रशासनाची जबाबदारी – शेरसिंग डागोर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आरोग्य, विमा, पदोन्नती, निवास, वेतन आणि अनुकंपा नियुक्ती यांसारख्या विषयांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

May 7, 2026 - 23:07
 0  2
सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडवा; प्रशासनाची जबाबदारी – शेरसिंग डागोर
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सफाई कर्मचारी, शेरसिंग डागोर

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ६ मे २०२६ : शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य टिकवून ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने आणि तातडीने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी महापौर रवि लांडगे यांनी शेरसिंग डागोर यांचे स्वागत केले.

या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, संदीप खोत, अण्णा बोदडे, पंकज पाटील, अतुल पाटील, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, पूजा दूधनाळे, निवेदिता घार्गे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, राजेंद्र शिंदे, जाहिरा मोमीन, महेश बरीदे, विनय ओहोळ, सोहन निकम, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठोस उपाययोजनांची गरज

शेरसिंग डागोर यांनी सांगितले की, सफाई कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. मात्र या योजनांचा लाभ प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घेणे आवश्यक आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी प्रत्यक्षात होणे गरजेचे असून त्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

आरोग्य, विमा आणि पदोन्नतीवर विशेष भर

कामाच्या स्वरूपामुळे सफाई कर्मचाऱ्यांना विविध आजारांचा धोका असल्याने त्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश डागोर यांनी दिले. धन्वंतरीसारख्या वैद्यकीय विमा योजनांचा लाभ कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, पदोन्नतीसंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या वेळेत पूर्ण करणे आणि लाड-पागे समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

निवास आणि वेतन प्रश्नांसाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच वेतनातील त्रुटी दूर करून सर्व शासकीय लाभ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावेत, असेही त्यांनी नमूद केले.

“सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण प्रश्नांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करून नियमित आढावा घेणे गरजेचे आहे,” असे डागोर यांनी सांगितले.

प्रशासन प्रलंबित प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध – आयुक्त

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने गतीने काम सुरू केले असून तांत्रिक आणि प्रक्रियात्मक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधींनी मांडल्या विविध समस्या

बैठकीदरम्यान सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. या समस्या ऐकून घेत शेरसिंग डागोर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

बैठकीच्या शेवटी काही कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0