विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी शालेय शिक्षण व महिला-बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विद्यार्थ्यांना ताजा, सकस आहार वेळेत मिळण्यासाठी शालेय शिक्षण व महिला-बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, देवेंद्र फडणवीस, शालेय पोषण आहार, सकस आहार, विद्यार्थ्यांचे आरोग्य, महिला व बालविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, केंद्रीय स्वयंपाकगृह, स्थानिक बचतगट, पोषण आहार, महाराष्ट्र सरकार, विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड, मिलेट आहार

प्रतिनिधी : नरेश शिंदे 

मुंबई, दि. ५ : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ताजा, सकस आणि दर्जेदार आहार वेळेत मिळण्यासाठी शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्त धोरण आखावे, तसेच स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरावर द्यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सध्या इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ दिला जातो. त्याऐवजी इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल का, याची व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले.

स्थानिक परिस्थितीनुसार पोषण आहाराचे नियोजन

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना केवळ केंद्रीय स्वयंपाकगृहाच्या पर्यायावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थिती आणि व्यवहार्यता लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे.

शहरी भागाबरोबरच ज्या ग्रामीण भागात केंद्रीय स्वयंपाकगृहाचा पर्याय व्यवहार्य आहे, तेथे त्याचा वापर करावा. मात्र दुर्गम आणि आदिवासी भागातील शाळांपर्यंत केंद्रीय स्वयंपाकगृहातून अन्न पोहोचण्यास वेळ लागत असल्यास तेथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक पर्याय स्वीकारावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्रीय स्वयंपाकगृहातून अन्न पुरविताना शाळांपर्यंत ते वेळेत आणि ताजे पोहोचते का, याची स्थानिक पातळीवर तपासणी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. शक्य असेल तेथे पोषण आहार वितरणाची जबाबदारी स्थानिक बचतगटांना देण्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार

संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांनी स्थानिक गरजा आणि उपलब्ध साधनसामग्री लक्षात घेऊन पोषण आहाराच्या व्यवस्थेबाबत निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आहाराची गुणवत्ता, सेवा आणि देयक व्यवस्थेबाबत स्पष्ट निकष निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाने जिल्हास्तरावर पोषण आहाराची मागणी आणि गरज यांचे मूल्यांकन करावे. दोन्ही विभागांकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा समन्वयाने वापर केल्यास योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संयुक्त धोरणासाठी स्थानिक सूचनांचा विचार

संयुक्त धोरण तयार करण्यापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात. स्थानिक पातळीवरील अडचणी, आवश्यकता आणि आवश्यक बदल यांचा अभ्यास करून व्यवहार्य सूचनांचा धोरणात समावेश करावा आणि त्यानंतर संयुक्त प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देशित केले.

स्थानिक प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पोषण आहार समितीची बैठक घेऊन त्या-त्या भागात उपलब्ध असलेल्या प्रथिने समृद्ध खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करण्याचे नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

स्थानिक आहारपद्धती आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन मिलेटयुक्त पदार्थांसह विविध पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचा विचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत समन्वय साधावा, असेही त्यांनी सांगितले.

दहावीपर्यंत पोषण आहार देण्याबाबत व्यवहार्यता तपासणार

सध्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत पोषण आहाराचा लाभ देण्याची मागणी आणि त्याची आवश्यकता लक्षात घेऊन इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्याची व्यवहार्यता तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

तांदळाचे प्रमाण कमी करण्याची सूचना

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय स्वयंपाकगृहाची व्याप्ती वाढविण्याची सूचना केली. ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देऊन स्थानिक पातळीवर पोषण आहार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्यांना देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

पोषण आहारातील तांदळाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी इतर धान्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करावी, अशी सूचनाही भुसे यांनी केली.

याशिवाय शालेय विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येत असून यापुढे पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

स्थानिक ताज्या आहारावर महिला व बालविकास विभागाचा भर

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शहरी भागातील ३० अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी ‘इस्कॉन’कडे देण्यात येत असल्याची माहिती दिली. या उपक्रमाची परिणामकारकता तपासून पुढील काळात अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय आहार समितीला स्थानिक परिस्थिती आणि उपलब्धता लक्षात घेऊन पोषण आहाराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्याची सूचना त्यांनी केली.

प्री-मिक्स किंवा फोर्टिफाईड पदार्थांऐवजी स्थानिक गरजेनुसार सुटे पदार्थ वापरून ताजा आहार देण्यावर भर द्यावा, असेही तटकरे यांनी सांगितले.

पोषण आहारात मैद्याचा वापर टाळण्याची सूचना

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पोषण आहारामध्ये मैद्याचा वापर करण्यात येऊ नये, अशी सूचना केली.

बैठकीत शालेय शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी संबंधित विभागांच्या वतीने सादरीकरण केले. तसेच अन्नामृत फाऊंडेशनच्या केंद्रीय स्वयंपाकगृहासंदर्भात इस्कॉनच्या प्रतिनिधींनीही सादरीकरण केले.

८५ हजारांहून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्य व केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित अशा ८५ हजार २०६ पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ दिला जातो.

केंद्र शासनाच्या निकषांनुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनयुक्त, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनयुक्त दुपारचे भोजन दिले जाते.

आहारात विविधता आणण्यासाठी विविध प्रकारचे पुलाव, खिचडी, उसळ, वरण-भात यांसह एकूण १२ प्रकारच्या पाककृती निश्चित करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

विद्यार्थ्यांना केवळ भोजन मिळणे नव्हे, तर वेळेत, ताजे, सकस आणि स्थानिक गरजांना अनुरूप पोषण आहार मिळणे हा या योजनेचा केंद्रबिंदू असावा, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत विशेष भर दिला.